मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याकडून घोषणा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी मंगळवारी विशाखापट्टणम हे शहर राज्याची नवी राजधानी होणार असल्याची घोषणा केली आहे. पुढील काही दिवसांमध्ये विशाखापट्टणम आमच्या राज्याची राजधानी होणार असून या शहरात तुम्हा सर्वांना आमंत्रित करत आहे. पुढील काही महिन्यांमध्ये मी देखील विशाखापट्टणममध्ये स्थलांतरित होणार असल्याचे जगनमोहन यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटले आहे.
जगनमोहन यांनी नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय राजनयिक आघाडीच्या बैठकीला संबोधित केले आहे. 3-4 मार्च रोजी विशाखापट्टणममध्ये एक जागतिक शिखर परिषद आयोजित करणार आहोत. विदेशी तसेच देशांतर्गत गुंतवणुकदारांनी आंध्रप्रदेशात येत तेथील उद्योगसुलभता अनुभवावी असे आवाहन रेड्डी यांनी केले आहे. यापूर्वी रेड्डी यांनी विशाखापट्टणम शहराला राज्य प्रशासनाचे मुख्य केंद्र म्हणून प्रस्तावित करत राज्याचे भविष्य विकेंद्रीत विकासात असल्याचे नमूद केले होते.
मुख्यालयाच्या स्वरुपात विशाखापट्टणममध्ये आता राज्यपालांचे वास्तव्य असणार आहे. तर विधानसभा अमरावतीमधून कार्य करणार आहे. राज्यभरात कार्यकारी, विधायिका आणि न्यायिक कार्यांच्या जागांचे वितरण हे समान क्षेत्रीय विकासाला चालना देणार आहे, तर देशात याची कुठेच समानता नसल्याचे रेड्डी यांचे मानणे आहे. यापूर्वी मागील चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाच्या सरकारने अमरावतीला आंध्रप्रदेशची राजधानी म्हणून घोषित केले होते. परंतु त्यानंतर सत्तेवर आलेल्या जगनमोहन सरकारने 3 शहरांना राजधानीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्याला विरोध होत असल्याचे पाहून आता विशाखापट्टणमला राजधानी म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
मार्चमध्ये जागतिक गुंतवणूकदार परिषद
विशाखापट्टणममध्ये 3-4 मार्च रोजी जागतिक गुंतवणुकदारांची परिषद आयोजित होणार आहे. यासंबंधी राज्य सरकारकडून पूर्वतयारी सुरू आहे. राज्य सरकारकडून अनेक राजदूत तसेच उद्योजकांना आमंत्रित करण्यात आले आहे. आंध्रप्रदेश मागील तीन वर्षांपासून दुहेरी अंकाचा विकासदर गाठत आहे. आंध्रप्रदेशने जीएसडीपीत 90.31 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसह 2021-22 मध्ये 11.43 टक्क्यांची वृद्धी नोंदविली आहे.









