बैठक अर्धवट सोडून आयुक्तांनी घेतला काढतापाय : स्वच्छता कामगारांच्या समस्यांचे निवारण करण्यात मनपा अपयशी
बेळगाव : स्वच्छता कामगारांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. स्वच्छता कामगारांना दिलेली हक्कपत्रे सात महिन्यांपूर्वी महापालिकेने परत घेतली. पण ती पुन्हा दिली नाहीत. महापालिकेने केवळ दिखाऊपणा केला आहे का? असा मुद्दा स्वच्छता कामगार निरीक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. त्यामुळे महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी आणि नियंत्रण समितीच्या सदस्यांमध्ये जोरदार वादावादी झाली.
स्वच्छता कामगार निरीक्षण समितीची बैठक सोमवारी महापालिका कार्यालयात आयुक्त कक्षात आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्वच्छता कामगारांच्या समस्यांबाबत विविध मुद्दे उपस्थित केले असता महापालिका आयुक्तांनी निरीक्षण समितीच्या सदस्यांना उद्धट उत्तरे दिली. तुमच्यापेक्षा आम्हाला स्वच्छता कामगारांची अधिक काळजी आहे, असे उत्तर देऊन आम्ही त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या असल्याचे सांगितले. त्यामुळे निरीक्षण समितीचे सदस्य माजी नगरसेवक दीपक वाघेला, विजय निरगट्टी आदींसह उपस्थित सदस्य संतापले. कोणत्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत, असे विचारले. तसेच मॅन्युअल स्कॅव्हेंजर अंतर्गत सर्वेक्षण केलेल्या कुटुंबीयांना ओळखपत्र देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. पण याची पूर्तता केली नाही. तसेच 14 स्वच्छता कामगारांना जागेचे हक्कपत्र देण्यात आले होते. पण सही झाली नसल्याचे कारण सांगत हक्कपत्र महापालिकेने पुन्हा घेतली आहेत. सात महिने झाले तरी ती हक्कपत्रे अद्याप देण्यात आली नाहीत. त्याचप्रमाणे 155 स्वच्छता कामगारांची पदे भरण्यासाठी अर्ज घेण्यात आले आहेत. पण निवड झालेल्या कामगारांची यादी अद्याप प्रसिद्ध केली नाही. त्याचप्रमाणे नव्याने 100 स्वच्छता कामगारांची निवड केली जाणार आहे. पण कामगारांना पीएफ व इतर कागदपत्रे देण्यास कंत्राटदार टाळाटाळ करीत आहे. जुन्या कामगारांना कामावरून कमी करण्याचा प्रकारही सुरू आहे. या समस्यांबाबत अनेकवेळा तक्रारी केल्या. पण याचे निवारण करण्यात आले नाही. त्यामुळे महापालिका स्वच्छता कामगारांसाठी कोणती दक्षता घेते? असा मुद्दा उपस्थित केला.
सदर बैठकीत पदाधिकाऱ्यांनी विविध माहिती सादर करण्याची सूचना आयुक्तांना केली. पण सध्या आपल्याला वेळ नाही, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक असल्याचे कारण देत महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनी बैठक अर्धवट सोडून काढतापाय घेतला. पण आम्हाला माहिती मिळेपर्यंत आम्ही जाणार नाही, अशी भूमिका निरीक्षण समितीच्या सदस्यांनी घेतली. त्यानंतर मोबाईलद्वारे संपर्क साधून आपण शुक्रवारी बैठक करू, असे आयुक्तांनी सांगण्याचा प्रयत्न केला. पण पदाधिकाऱ्यांनी काहीच ऐकले नाही. अखेर उपलब्ध असलेली माहिती निरीक्षण समितीच्या सदस्यांना देण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक दीपक वाघेला, अध्यक्ष मुनीस्वामी भंडारी, विजय निरगट्टी, महिला विभागाच्या मालती सक्सेना, अरुणा साके, राममोहन साके, रुक्मिणी बळ्ळारी, नागम्मा होसपीठी, बालकोटीया आदी सदस्य उपस्थित होते.









