सर्वसामान्यांना दिलासा : 15 किलोचा डबा 2300 रुपये
बेळगाव : मागील काही दिवसांपासून वाढलेल्या खाद्यतेलांचे दर हळूहळू कमी होऊ लागले आहेत. विशेषत: सूर्यफूल तेलदरात 20 ते 25 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दिवाळी दरम्यान 2600 रुपये असणाऱ्या 15 किलो तेलडब्याचा दर 2300 रुपयांपर्यंत खाली आला आहे. मात्र पामतेल, शेंगातेल आणि इतर खाद्यतेलांच्या किमती अद्याप कमी झाल्या नाहीत. इंधन, जीवनावश्यक वस्तू आणि इतर महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम खाद्यतेलावर झाला होता. तेव्हापासून खाद्यतेलांचे दर भडकले आहेत. दिवाळी दरम्यान तर तेलडबा 2700 रुपयांपर्यंत गेला होता. मात्र आता सूर्यफूल तेलदरात घसरण होऊ लागली आहे. 170 रु. किलो असणारे सूर्यफूल तेल 150 रु. किलो झाले आहे.
गृहिणींकडून स्वयंपाकासाठी शेंगतेल, सोयाबीन, सूर्यफूल आणि पामतेलाचा वापर केला जातो. मात्र सूर्यफूल वगळता इतर तेलांचे दर अद्याप कमी झाले नाहीत. त्यामुळे सर्व खाद्यतेलांचे दर कधी कमी होणार? अशी चिंता सर्वसामान्यांना पडली आहे. स्वयंपाकासाठी विशेषत: सूर्यफूल तेलाला अधिक पसंती दिली जाते. त्यामुळे सूर्यफूल तेलाला मागणीदेखील अधिक आहे. दरम्यान सूर्यफूल तेलाचेच दर कमी झाल्याने महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे. मागील वर्षभरापासून खाद्यतेलाच्या किमती भरमसाट वाढल्या होत्या. त्यामुळे व्यावसायिकही अडचणीत सापडले होते. खाद्यतेलामुळे पदार्थांचे दर वाढले होते. शिवाय हॉटेल आणि हातगाड्यांवरील खाद्यपदार्थ दरातही वाढ झाली होती. मात्र आता सूर्यफूल तेलदरात घट झाल्याने व्यावसायिकांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मध्यंतरी सूर्यफूल तेलाचा 15 किलोचा डबा 2700 रुपयांपर्यंत गेला होता. तो आता 2300 रुपये झाला आहे. त्यामुळे तेल विकत घेणाऱ्या सर्वसामान्यांना सोयीस्कर झाले आहे. शासनाने तेलांच्या किमती कमी होण्याचे संकेत दिले होते. मात्र अद्याप सूर्यफूल वगळता इतर खाद्यतेलांचे दर कमी झाले नाहीत.









