बेनकनहळ्ळीत शासकीय इतमामात अंत्यविधी : वायुसेनेच्यावतीने बंदुकीच्या फैरी झाडून सलामी

बेळगाव : मोरेना मध्यप्रदेश येथे झालेल्या वायुदलाच्या विमान दुर्घटनेत बेळगाव, गणेशपूर येथील विंग कमांडर हणमंतराव रेवणसिद्दाप्पा सारथी (वय 34) या वैमानिकाला वीरमरण आले. रविवारी दुपारी त्यांचे पार्थिव बेळगावात दाखल झाले. सायंकाळी बेनकनहळ्ळी येथील स्मशानभूमित शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडला. हजारो नागरिकांच्या साश्रुनी त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. ‘अमर रहे, अमर रहे वीर जवान हणमंतराव अमर रहे’ अशा घोषणा देऊन त्यांना निरोप देण्यात आला.

दोन लढाऊ विमानांच्या सरावावेळी झालेल्या अपघातात विंग कमांडर हणमंतराव सारथी यांना वीरमरण आले. मिराज या विमानाचे वैमानिक म्हणून ते वायुसेनेत कार्यरत होते. शनिवारी झालेल्या दुर्घटनेत सुखोई-30 या विमानातील वैमानिक बाहेर पडल्याने ते जखमी झाले. मात्र विंग कमांडर हणमंतराव सारथी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या या दुर्दैवी मृत्युमुळे बेळगाव परिसरात शोककळा पसरली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बेळगाव परिसरातील वातावरण शोकमग्न झाले आहे. सरावावेळी झालेल्या घटनेत हणमंतराव सारथी यांना वीरमरण आल्याने त्यांना निरोप देण्यासाठी हजारो नागरिक सकाळी 11 पासून प्रतीक्षेत होते. ग्वाल्हेरहून विशेष विमानाने विंग कमांडर हणमंतराव सारथी यांचे पार्थिव रविवारी दुपारी सांबरा येथील विमानतळावर आले. त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन करण्यात आले. तेथून शौर्यचौक मार्गे रामघाट रोडने दुपारी 2 वाजता गणेशपूर येथे पार्थिव आणण्यात आले. त्यांना अभिवादन करण्यासाठी रामघाटरोडवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पाईपलाईन रोडपासून त्यांच्या घरापर्यंत रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच रस्त्याच्या दुतर्फा थांबून नागरिकांनी पुष्पवृष्टी करीत हणमंतराव सारथी यांना अभिवादन केले. यावेळी काही ठिकाणी देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती. त्याचप्रमाणे अभिवादन करण्यासाठी बॅनरदेखील लावण्यात आले होते.

अमर रहे अमर रहे वीर जवान हणमंतराव अमर रहे, वंदे मातरम्, बोलो भारत माता की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. पाईपलाईन रोडपासून क्रांतीनगरपर्यंत संपूर्ण रस्ता नागरिकांच्या गर्दीने भरला होता. त्यांचे पार्थिव घरी नेण्यात आले. त्या ठिकाणी कुटुंबीयांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर बेनकनहळ्ळी येथील स्मशानभूमिकडे नेण्यात आले. यावेळी गणेशपूर, शिवमनगर, क्रांतीनगर, बेनकनहळ्ळी, ज्योतीनगर अशा विविध परिसरातील रहिवाशांनी पुष्पवृष्टी करून मानवंदना दिली.

गणेशपूर येथील स्मशानभूमीत सुविधा नसल्याने त्यांच्यावर बेनकनहळ्ळी गावातील स्मशानभूमित अंत्यविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या ठिकाणी अंत्यविधीची सोय करण्यात आली होती. बेनकनहळ्ळी स्मशानभूमित दाखल झाल्यानंतर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर तसेच बेनकनहळळी ग्रा. पं. सदस्यांच्यावतीने पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. तसेच वायुसेना, सैन्यदलाच्या विविध अधिकाऱ्यांनी व माजी सैनिक संघटनेच्यावतीने पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी हणमंतराव सारथी यांचे आई-वडील तसेच पत्नी व बंधू आणि नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतले. अंत्यविधीपूर्वी तिरंगा ध्वज आणि त्यांचा गणवेश त्यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आला. हिंदू आणि लिंगायत पद्धतीने अंत्यविधीच्या विधी पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर वायुसेनेच्यावतीने बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. यावेळी गावातील विविध संघटना, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांच्यावतीने पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी नितेश पाटील, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मंत्राग्नी देऊन विंग कमांडर हणमंतराव सारथी यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

विमान दुर्घटनेत विंग कमांडर हणमंतराव सारथी यांना वीरमरण आल्याची माहिती मिळाल्याने माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी गणेशपूरला भेट दिली. यावेळी विंग कमांडर हणमंतराव सारथी यांचे वडील रेवणसिद्दाप्पा सारथी व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी खासदार मंगला अंगडी, आमदार शशिकला जोल्ले, माजी आमदार संजय पाटील, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनीदेखील कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.









