तालुका म. ए. समितीतर्फे महिला मेळावा : महिलांची लक्षणीय उपस्थिती
बेळगाव : सीमाभागातील मराठी माणसासाठी सीमाप्रश्न हा निष्ठेचा प्रश्न आहे. यामध्ये महिलांचे योगदानही मोठे आहे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनीही आता रस्त्यावर उतरले पाहिजे. सीमाभागातील मराठी भाषा आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी म. ए. समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे, असे विचार अॅड. तृप्ती सडेकर यांनी मांडले. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रविवारी मराठा मंदिर येथे तिळगूळ समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन झाले. कमल मन्नोळकर यांनी प्रास्ताविक केले. सडेकर पुढे म्हणाल्या, राष्ट्रमाता राज्यमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवून कार्य केले पाहिजे. सीमाभागातील शेती आता धोक्यात आली आहे. याबाबत राष्ट्रीय पक्षातील लोकप्रतिनिधी काहीच बोलत नाहीत. केवळ म. ए. समिती लढा देत आहे. यासाठी महिलांनी एकत्रित येऊन बळकटी देण्याची गरज आहे.
शीतल बडमंजी म्हणाल्या, समाजात आज मोबाईलचा वापर वाढला आहे. अशा परिस्थितीत आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मोबाईलचा वापर अतिरिक्त होत असल्याने मुलांवर विपरित परिणाम होऊ लागले आहेत. मोबाईलवरून चांगले देखील शिकता येते. यासाठी मोबाईलचा वापर कशासाठी करावा? याचे तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. यावेळी जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील म्हणाल्या, आम्ही जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकी आहोत. मागील 66 वर्षांपासून लढा देत असलेल्या म. ए. समितीच्या पाठीमागे ठाम राहून अन्याय दूर केला पाहिजे. यावेळी वैष्णवी मंगनाईक हिने शाहिरी पोवाडा सादर केला. सूत्रसंचालन कमल हलगेकर यांनी केले तर मनोहर संताजी यांनी आभार मानले.









