वार्ताहर /कुंडल
कुंडल (पलूस) येथे झालेल्या कुस्ती मैदानामध्ये हरियाणाचा अर्जूनवीर पुरस्कार विजेता मल्ल सुमित मलिक विजयी झाला. त्याने जम्मूचा भारत केसरी मल्ल अमिन बेनिया याला नमवत प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकली.
सुरुवातीला थोडावेळ एकमेकांचा अंदाज घेतल्यानंतर दोन्ही पैलवान आक्रमक झाले. सुमितने बेनियाचा एकेरी पट काढणेचा प्रयत्न केला. पण, बेनियाने डाव उलटवून लावला. काहीवेळ रटाळ खेळ केल्यानंतर पंचांनी दोघांना समज दिली व पाच मि. चा वेळ दिला. त्या पाच मिनिटानंतर ही निकाल न लागल्याने पंचांनी व अध्यक्षांनी कुस्ती गुणावर लावली. त्यानंतर दोन मिनिटात सुमितने अमिनवर गुण मिळवून मात केली. ही कुस्ती क्रांतीअग्रणी जी. डी. लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरणार्थ तसेच भारताचे अमृतमहोत्सव निमित्त आमदार अरुण अण्णा लाड यांच्या कुटूंबाच्या वतीने लावण्यात आली. या कुस्तीसाठी दीड लाख व विमान प्रवास असे बक्षीस होते. या कुस्तीसाठी पंच म्हणून पुण्याचे गोविंद पवार यांनी काम पाहिले.
दुसऱ्या क्रमांकासाठी दिल्लीचा हिंदकेसरी मोनु खुराणा विरुद्ध पुण्याचा उप महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यातील कुस्ती पोकळ घिस्सा डावावर सात मि, नंतर महेंद्र गायकवाड विजयी झाला. कुस्तीसाठी एक लाख पंचवीस हजार रु बक्षीस ठेवणेत आले होते. तिसरी कुस्ती हिंदकेसरी प्रविण कोहली विरुद्ध नॅशनल चॅम्पियन माऊली कोकाटे यांच्यात लावणेत आली. ही कुस्ती सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड व हैबतराव बापू लाड यांच्या वतीने एक लाख रूपये ची लावणेत आली. या कुस्तीमध्ये गुणांवर माऊली कोकाटे विजयी झाला. या कुस्तीसाठी पंच म्हणून विकास पाटील बोरगाव हे होते.
चौथी कुस्ती माऊली जमदाडे विरुद्ध कालु बडवाल (हरीयाणा) यांचेमध्ये कॅप्टन रामचंद्र श्रीपती लाड (भाऊ) यांचे स्मरणार्थ संताजी लाड, धनाजी लाड व कुटुंबियांचे वतीने लावणेत आली. पंच शहाजी पवार यांनी काम पाहिले. पोकळ घिस्सा डावावर माऊली जमदाडे विजयी झाला. मात्र तक्रारीनंतर पुन्हा कुस्ती लावली. त्यात बॅक थ्रो डावावर माऊली विजयी झाला. पाच नंबार च्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख (हनुमान आखाडा, पुणे) विरुद्ध मोनु दहिया (हरीयाणा) यांच्यात होऊन घीस्सा डावावर बाला रफिक शेख विजयी झाला.
तसेच मामासाहेब पवार सत्यविजय बँकेच्या वतीने लावणेत आलेल्या कुस्तीमध्ये प्रकाश बनकर( गंगावेश) विरुद्ध रवि वेहरा( पंजाब) यांच्यात लढत होऊन प्रकाश बनकर गुणावर विजयी झाला, पंच म्हणून राजेंद्र शिंदे यांनी काम पाहिले.
किर्लोस्कर कंपनीची तीन लाख रु.साठीची कुस्ती महारुद्र काळे (कुर्डूवाडी), वि. लवप्रित खन्ना यांचेत लढत होऊन महारुद्र काळे घुटना डावावर विजयी झाला. तर अन्य प्रमुख कुस्तीमध्ये योगेश कुमार( दिल्ली) वि. अक्षय मदने(कडेगाव) यांचेमध्ये लढत होऊन अक्षय मदने हा विजयी झाला.
मैदानास हिंदकेसरी विकास जाधव, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष पृथ्विराज देशमुख, गणेश मानुगडे, आदींनी भेटी दिल्या. प्रारंभी मैदानाचे पुजन आ.अरुण अण्णा लाड, बाळासाहेब पवार, महेंद्र लाड, किरण लाड, शरद लाड, ह्रशिकेश लाड, अशोक भिमराव लाड, संग्राम पाटील, प्रदिप कस्तुरे, बाळासाहेब लाड, हिम्मत पवार, कार्याध्यक्ष हणमंत लाड, मुकुंद जोशी, अशोक पवार श्रीकांत लाड, सर्जेराव पवार, उत्तमराव पवार,राजेंद्र लाड, डॉ. योगेश लाड आदीसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाले.









