केरळच्या राज्यपालांचे प्रतिपादन ः मलाही हिंदूच म्हणा
वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम
हिंदू एक धार्मिक शब्द नसून तो भौगोलिक शब्द आहे. भारतात जन्मलेला, देशात लहानाचा मोठा झालेला प्रत्येक व्यक्ती हिंदूच आहे. मला देखील हिंदू म्हटले जावे असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केले आहे. तिरुअनंतपुरम येथे अमेरिकेत स्थायिक झालेल्या मल्याळी हिंदूंकडून आयोजित ‘हिंदू संमेलना’ला त्यांनी संबोधित केले आहे.
हिंदू एक धार्मिक शब्द असल्याचे मला वाटत नाही, तो भौगालिक शब्द असल्याचे उद्गार सर सैयद अहमद खान यांनी काढले होते. जो कोणी भारतात जन्मला, भारतात पिकलेले अन्न खातो, येथील नद्यांचे पाणी पितो, तो स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यास पात्र आहे. इंग्रजांच्या काळात हिंदू, मुस्लीम आणि शीख यासारख्या शब्दांचा वापर केला जात होता, इंग्रजांनी लोकांना धर्माच्या आधारावर विभागून टाकले होते असे आरिफ मोहम्मद खान म्हणाले.
बीबीसी माहितीपट हा एक कट
केरळ राज्यपालांनी बीबीसीच्या माहितीपटावर जोरदार टीका केली आहे. भारताला 100 तुकडय़ांमध्ये विभागलेले पाहू इच्छिणारे लोक त्रस्त असल्यानेच अशाप्रकारचा नकारात्मक प्रचार करत आहेत. भारताला अंधकारात पाहू इच्छिणाऱया लोकांचा हा कट आहे. इंग्रज भारतावर राज्य करत असतानाच्या काळावर त्यांच्याकडून माहितीपट का तयार केले जात नाहीत असे प्रश्नार्थक विधान त्यांनी केले आहे.
भारत गरीब देश नव्हता, याचमुळे विदेशी आक्रमक भारतीय संपत्ती ओरबाडून घेण्यासाठी येथे आले होते. परंतु 1947 पर्यंत आम्ही दक्षिण आशियात गरीबीचे प्रतीक ठरलो. पण आता सर्व काही बदलले आहे. भारतीय आता जगातील अनेक दिग्गज बहुराष्ट्रीय कंपन्यांचे नेतृत्व करत आहेत. यातून जगाला भारताच्या क्षमतेची जाणीव होत असल्याचे आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटले आहे.









