6 कोटी वर्षे जुन्या शिळा ः नदीतून बाहेर काढत अयोध्येत आणल्या जात आहेत 40 टन वजनी शिळा
वृत्तसंस्था / जनकपूर
नेपाळमधून दोन विशाल शाळिग्राम शिळा अयोध्येत आणल्या जात आहेत. या शिळांचा वापर करत भगवान श्रीराम आणि सीतामातेची मूर्ती तयार केली जाणार आहे. या शिळा सुमारे 6 कोटी वर्षे जुन्या असल्याचा दावा करण्यात येत आहे. या शिळांद्वारे तयार होणाऱया मूर्ती अयोध्येतील मंदिराच्या गर्भगृहात ठेवल्या जाणार का परिसरात अन्य ठिकाणी प्रतिष्ठापित केल्या जाणार हे अद्याप निश्चित नाही, यासंबंधी अंतिम निर्णय राम मंदिर ट्रस्टच घेणार आहे.
नेपाळमध्ये पोखरा येथील शाळिग्रामी नदी (काली गंडकी) मधून या दोन्ही शिळा जियोलॉजिकल आणि ऑर्कियोलॉजिकल तज्ञांच्या देखरेखीत बाहेर काढण्यात आल्या आहेत. 26 जानेवारी रोजी या शिळा ट्रकमध्ये लोड करण्यात आल्या. पूजा-अर्चनेनंतर दोन्ही शिळा ट्रकद्वारे रस्तेमार्गाने अयोध्येसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. या प्रवासात या शिळांचे दर्शन आणि स्वागतासाठी नेपाळमध्ये लोकांनी मोठी गर्दी केली आहे. एका शिळेचे वजन 26 टन तर दुसऱयाचे वजन 14 टन आहे.
जनकपूरमध्ये 5 कोसी परिक्रमेनंतर या शिळा अयोध्येच्या दिशेने प्रस्थान होतील. महंत संत श्रीरामतपेश्वरदास महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी महंत रामरोशनदान महाराज यांच्या नेतृत्वात ही परिक्रमा होणार आहे. पवित्र शिळा नेपाळच्या जटही सीमेतून भारतात दाखल होणार आहेत.
या शिळा अयोध्येत पोहोचल्यावर ट्रस्ट पुढील कार्य हाती घेणार आहे. या शिळा अयोध्येत 2 फेब्रुवारीपर्यंत पोहोचू शकतात. शाळिग्रामी नदीतून काढण्यात आलेल्या या दोन्ही शिळा सुमारे 6 कोटी वर्षे जुन्या असल्याचे सांगण्यात येत असल्याचे राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल म्हणाले. नेपाळची शाळिग्रामी नदी भारतात प्रवेश करताच नारायणी होते. शासकीय कागदपत्रांमध्ये याचे नाव बूढी गंडकी दी आहे. शाळिग्रामी नदीतील काळे दगड भगवान शाळिग्रामच्या स्वरुपात पुजले जातात. शाळिग्राम दगड केवळ शाळिग्रामी नदीतच मिळतात असे सांगण्यात येते. ही नदी दामोदर कुंडात उगम पावून बिहारच्या सोनपूरमध्ये गंगा नदीत सामावून जाते.
नदीची क्षमायाचना
नदीच्या काठावर या विशाल शिळांना बाहेर काढण्यापूर्वी धार्मिक विधी करण्यात आले. तसेच नदीकडे क्षमायाचना करण्यात आली. आता या शिळा अयोध्येत आणल्या जात आहेत. शिळा यात्रेसोबत सुमारे 100 लोक चालत आहेत. विश्रामस्थळी या लोकांच्या वास्तव्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विहिंपचे केंद्रीय उपाध्यक्ष जीवेश्वर मिश्र, राजेंद्र सिंह पंकज, नेपाळचे माजी उपपंतप्रधान कमलेंद्र निधि, जनकपूरचे महंत देखील या यात्रेत सामील आहेत. यात्रेसोबत राम मंदिर ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल देखील आहेत.
राम जन्मभूमीचा जुन्या मंदिराशी संबंध
पुरातत्व तज्ञ आणि अयोध्येवर अनेक पुस्तके लिहिलेले डॉ. देशराज उपाध्याय यांनी शाळिग्राम शिळेसंबंधी अधिक माहिती दिली आहे. नेपाळच्या शाळिग्रामी नदीत काळय़ा रंगाचे विशेष दगड आढळून येतात. धार्मिक मान्यतांमध्ये त्यांना शाळिग्राम देवाचे रुप म्हटले जाते. प्राचीनकाळाच्या मूर्तिकलेत या दगडाचा वापर केला जात होता. शाळिग्रामी शिळा अत्यंत मजबूत असतात, याचमुळे शिल्पकार सुक्ष्म गोष्टी कोरू शकतो. अयोध्येत राम जन्मभूमीच्या जुन्या मंदिरातील अनेक स्तंभ याच शिळेद्वारे तयार करण्यात आले होते असे उपाध्याय यांनी सांगितले आहे.









