‘मेक इन इंडिया’साठी 20 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो रेल्वेचा निधी
आगामी अर्थसंकल्पात रेल्वेचा ‘मेक इन इंडिया’वर अधिक भर असणार आहे. पुढील 7 वर्षांमध्ये रेल्वेचा पूर्णपणे कायापालट घडवून आणण्याची तयारी आहे. जुन्या रेल्वेमार्गांना बदलून जुन्या रेल्वेगाडय़ांच्या तुलनेत नव्या आवृत्तीच्या सुरक्षित आणि वेगवान रेल्वे सुरू करण्याचा मानस आहे. तसेच हे उद्दिष्ट गाठताना पूर्णपणे देशात निर्मित सुटय़ा भागांचा वापर केला जाणार आहे. याचबरोबर या सुटय़ा भागांची विदेशात निर्यात करण्याची योजना आहे. देशात रेल्वेमधून दररोज 2.5 ते 3 कोटी लोक प्रवास करतात. या मोठय़ा संख्येतील प्रवाशांकरता स्थानकांची पुनर्निर्मिती, साफसफाई, सुविधाजनक आणि सुरक्षित रेल्वेगाडय़ांची निर्मिती केली जात आहे.
स्वदेशी निर्मितीला चालना देण्यासाठी रेल्वे मंडळाने अर्थसंकल्पपूर्व बैठकीनंतर अर्थ मंत्रालयाकडून 25-30 टक्के अधिक निधीची मागणी केली आहे. रेल्वेला जवळपास 2 लाख कोटी रुपयांचा निधी मिळू शकतो असे मानले जात आहे. मेक इन इंडिया मोहिमेला पुढे नेण्यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात 20 टक्क्यांची वाढ केली जाणार असल्याचा अनुमान आहे.

कोरोनाकाळात आव्हानांवर मात
कोरोना काळातील आव्हानांना मागे टाकत रेल्वेने मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत 42 हजार कोटी रुपयांहून अधिक महसूल प्राप्त केला आहे. रेल्वेचे उत्पन्न 71 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. उत्पन्न वाढल्यावर आता रेल्वेगाडय़ांच्या निर्मितीसाठी उत्तम देशांतर्गत सुविधा निर्मितीवर लक्ष दिले जात आहे. रेल्वे स्वतःच्या आवश्यकतेच्या 97-98 टक्क्यांपर्यंत देशांतर्गत निर्मितीतून गरज भागविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीतून दर महिन्याला 7-8 वंदे भारत रेल्वेगाडय़ांची निर्मिती केली जात आहे. याचा पहिला स्वदेशी ट्रेन सेट केवळ दीड वर्षात पूर्ण करण्यात आला होता. 15 ऑगस्टपर्यंत 75 वंदे भारत रेल्वेगाडय़ा संचालित करण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कपूरथळा आणि रायबरेलीच्या कोच फॅक्टरीतून लवकरच या रेल्वेची निर्मिती सुरू होणार आहे. बेंगळूर येथील रेल व्हील फॅक्टरी आणि बेला येथील रेल व्हील पॉइंट चाकं, इंजिन आणि डब्यांचा पुरवठा करत आहे. दोन्ही प्रकल्पांमध्ये चालू आर्थिक वर्षात 1 लाखाहून अधिक चाकांची निर्मिती करण्यात आली. हे प्रमाण त्यापूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत 6.5 पट अधिक आहे.
सुरक्षा कवचाच्या निर्यातीची तयारी
रेल्वेने स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे उपकरण विकसित करत रेल्वे दुर्घटनांचे प्रमाण शून्यावर आणण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. सिग्नलकडे डोळेझाक तसेच अत्याधिक वेगादरम्यान मानवी त्रुटींमध्ये होणाऱया दुर्घटना रोखण्यासाठी रेल्वेने स्वदेशी प्रणाली ‘कवच’ विकसित केले आहे. पहिल्या टप्प्यात 3 हजार किलोमीटरचे दोन रेल्वेमार्ग दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा येथे या प्रणालीचा अवलंब केला जात आहे. ही प्रणाली टप्पाबद्ध पद्धतीने सर्व मार्गांवर संचालित केली जाणार आहे. पुढील काळात ही प्रणाली निर्यात करण्याचीही तयारी आहे.









