वृत्तसंस्था/ पोश्चेफस्ट्रूम
येथे सुरू असलेल्या आयसीसीच्या महिलांच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडच्या महिला संघाने उपांत्य सामन्यात बलाढय़ ऑस्ट्रेलियाचा 3 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता या स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात जेतेपदासाठी रविवारी येथे लढत होत आहे.
या स्पर्धेतील दुसऱया उपांत्य सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा डाव 19.5 षटकात 99 धावात आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव 18.4 षटकात 96 धावात इंग्लंडने गुंडाळला. या दोन्ही संघातील गोलंदाजांनी दर्जेदार कामगिरी केली. इंग्लंडच्या हॅने बेकरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघामध्ये चार फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. इंग्लंडच्या स्टोनहाऊसने 33 चेंडूत 2 चौकारांसह 25, कर्णधार स्क्रीव्हेन्सने 20 चेंडूत 2 चौकारांसह 20, स्मेलीने 2 चौकारांसह 10 तर ग्रोव्हेसने 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. इंग्लंडच्या डावामध्ये केवळ 8 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे मॅगी क्लार्क, इला हेवर्ड आणि सायना जिंजिर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. इलिंगवर्थने 1 बळी मिळविला.
प्रत्युत्तरादाखल खेण्ताना इंग्लंडच्या अचूक आणि भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 18.4 षटकात 96 धावात संपुष्टात आल्याने या बलाढय़ संघाचे स्पर्धेतील आव्हान उपांत्यफेरीतच समाप्त झाले. ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये ऍमी स्मिथने 26 चेंडूत 3 चौकारांसह 26, क्लेरी मूरने 22 चेंडूत 3 चौकारांसह 20 तर हेवर्डने 22 चेंडूत 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 12 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे हॅना बेकरने 10 धावात 3 तर स्क्रीव्हेन्सने 8 धावात 2 त्याचप्रमाणे ग्रोव्हेस, मॅकडोनाल्ड, अँडरसन आणि स्टोनहाऊस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड 19.5 षटकात सर्वबाद 99 (स्टोनहाऊस 25, स्क्रीव्हेन्स 20, स्मेली 10, ग्रोव्हेस 15, क्लार्क, हेवर्ड, जिंजिर प्रत्येकी 3 बळी, इलिंगवर्थ 1-21), ऑस्ट्रेलिया 18.4 षटकात सर्वबाद 96 (ऍमी स्मिथ 26, क्लेरी मूर 20, हेवर्ड 16, हॅना बेकर 3-10, स्क्रीव्हेन्स 2-8, ग्रोव्हेस, मॅकडोनाल्ड, अँडरसन आणि स्टोनहाऊस प्रत्येकी 1 बळी).









