राजस्थानातील नागौर जिल्हय़ाच्या प्रशासनाने एका कल्पक उपाययोजनेद्वारे शहराच्या सौंदर्याचे संवर्धन केले आहे. शहरातील सार्वजनिक भिंती त्यांनी मुलांच्या कलेसाठी मोकळय़ा करून दिल्या आहेत. चित्रकलेत स्वारस्य असणारी मुले या भिंतींवर वेगवेगळी चित्रे रेखाटतात आणि ती रंगवतात. त्यांचे कलाशिक्षक त्यांना याकामी साहाय्य करतात. भिंती अशा सुशोभित केल्यामुळे त्यांच्या आडोशाने लघुशंका करण्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. भिंतीवर देवदेवतांची चित्रेही रंगविली जातात. त्यामुळे अशा भिंतींचा गैरवापर करणाऱयांवरती एक नैतिक बंधन येते. अशाप्रकारे नागौर शहराचे सौंदर्यवर्धन करण्यात आले आहे.
नागौर जिल्हय़ाचे आयुक्त पियुष समारिया आणि मुख्य अधिकारी सोहनलाल खटनावलिया यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. रंगकाम करण्यासाठी मुलांना साधनसामग्री प्रशासनाच्यावतीने पुरविण्यात येते. तथापि, मुलांना कोणतेही वेतन किंवा अर्थसाहाय्य दिले जात नाही. मुले स्वेच्छेने आणि स्वयंस्फूर्तीने आपल्या कलेचे प्रदर्शन भिंतींवर करतात. यातून दोन उद्देश साध्य होत आहेत. मुलांना त्यांची चित्रकलेची प्रतिभा लोकांसमोर मांडण्यासाठी एक स्थान उपलब्ध झाले आहे. तसेच शहराची स्वच्छता आपोआप राखली जात आहे. चित्रकला जाणणारी मुले या उपक्रमात अत्यंत उत्साहाने भाग घेत आहेत. त्यांच्या शाळाही त्यांना प्रोत्साहित करीत आहेत. या कामासाठी या मुलांना ग्रेस मार्कही दिले जातात.
या उपक्रमाने मुलांच्या पालकांना वेगळेच समाधान दिले आहे. अलीकडच्या काळात मुले घरी आल्यानंतर मोबाईलशी खेळत बसतात. त्यामुळे त्यांची शारीरिक हालचाल मंदावल्याने लहानपणापासूनच ब्लडप्रेशर आणि डायबेटिस सारखे विकार मुलांना जडत आहेत. मात्र, नागौर जिल्हय़ातील या उपक्रमामुळे मुले शाळा सुटल्यानंतर किंवा शाळा सुरू होण्याआधी घरातून बाहेर पडत असल्यामुळे त्यांचा व्यायाम आणि शारीरिक हालचालीही आपोआप होतात.









