सरकारच्या सूचनेनंतर महापालिकाचा निर्णय : पालिका बैठकीत विविध विषयांवर चर्चा, वाद-विवाद
पणजी : स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सुरू असलेली सर्व कामे 15 मार्चपर्यंत बंद ठेवावीत, असे सरकारकडून सूचना आल्याने ही सर्व कामे आता बंद करण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी विविध कामांसाठी रस्ते खणले आहेत, त्यांचे पुन्हा नव्याने डांबरीकरण करण्यात येईल, अशी माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी आज पालिका बैठकीत दिली.
तत्पूर्वी बैठकीच्या सुरवातीलाच नगरसेवक उदय मडकईर व सुरेंद्र फुर्तादो यांनी शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामावर आक्षेप घेतला. स्मार्ट सिटीच्या कामामुळे पूर्ण पणजीकरांना वेठीस धरले जात आहेत. हे काम कधी पूर्ण होणार आणि नेमके कोणकोणत्या कंत्राटदारामार्फत सुरू आहेत, याची माहिती या बैठकीत देऊन कंत्राटदारालाच बैठकीत बोलवावे, अशी जोरदार मागणी केली. महापौर मोन्सेरात यांनी कंत्राटदाराला बोलवून घेण्यात येईल, असे सांगण्यात आल्यानंतर विरोधी नगरसेवकांनी दुसऱ्या विषयावर चर्चा करण्यास सहमती दर्शवली.
पालिका बैठकीला उपस्थित नगराध्यक्ष रोहित मोन्सेरात, उपनगराध्यक्ष संजीव श्यामसुंदर नाईक, आयुक्त क्लेन मदेरा नगरसेवक उदय मडकईकर, सुरेंद्र फुर्तादो, नेल्सन काब्राल, युवराज फ्रान्सिस फर्नांडिस, कारिलीना पो, शुभदा शिरगावकर, बेन्टो नोरेन्हा, जॉयल आंद्राद, ऊथ फुर्तादो, प्रसाद आमोणकर, करण पारेख, वर्षा शेट्यो, प्रमय माईणकर, शायनी चोपडेकर, डेनिस जॉर्ज, आदिती चोपडेकर, शुभम चोडणकर, नरसिंहा मोरजकर, मनिषा मणेरकर, दीक्षा माईणकर, संतोष सुर्लकर, प्रांजल नाईक, वसंत आगशीकर, लोरेन डायस, विठ्ठल चोपडेकर सिल्वेस्टर फर्नांडिस, सॅण्ड्रा कुन्हा, कबिर मखिजा, किशोर शास्त्री उपस्थित होते.
महापौर मोन्सेरात म्हणाले, जी-20 शिखर बैठकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने पणजी महापालिकेला स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राजधानीत सुरू असलेली सर्व कामे 15 मार्चपर्यंत थांबवण्यास सांगितले आहे. त्यामुळे खोदकाम बंद करण्याबरोबरच रस्त्यांचेही डांबरीकरण केले जाईल, असे ते म्हणाले.
गेल्या काही महिन्यांपासून कांपाल हेरिटेज येथील एफ. एल. गोम्स उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून महापालिकेने किती महसूल गोळा केला याची माहिती पालिका सभागृहासमोर ठेवावी, अशी जोरदार मागणी नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी करीत महापौर मोन्सेरात यांना कात्रित पकडले. याशिवाय सेरेंडिपिटी कंपनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी 40 लाख ऊपये खर्च आला तर एवढी मोठी रक्कम पालिकेला कुणी अधिकृत केली याचीही माहिती बैठकीत द्यावी, अशी मागणी फुर्तादो यांनी केली. मिरामार येथील पोस्ट ऑफिसची सध्या स्थिती काय आहे, याबाबतही नगरसेवक फुर्तादो यांनी विचारणा केली. यावर महापौर मोन्सेरात यांनी या सर्वांची माहिती देण्याचे मान्य केले.
पत्रकार व ज्यांच्याकडे वाहने पार्किंगसाठी जागा नाही अशा जुन्या इमारतीतील स्थानिक रहिवासी यांना पे-पार्किंगमधून सवलत मिळावी, आणि तसा ठराव संमत करावा, अशी मागणी नगरसेवक उदय मडकईकर यांनी करून पुन्हा एकदा नव्याने तसा निर्णय अंमलात आणावा, असे बैठकीत सूचविले. आजच्या बैठकीत शहरातील उद्याने, पदपथ, पथदिप दुऊस्तीबाबतही चर्चा करण्यात आली.
अभिनंदन ठराव संमत
नगरसेवक जॉयल आंद्राद यांची गोवा प्रदेश युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने आज पालिका बैठकीत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी या ठरावाला सहमती दर्शवून नगरसेवक आंद्राद यांचे अभिनंदन केले.
दोन वर्षांपासून प्रभागासाठी 1 ऊपयाही नाही
गेली अनेक वर्षे शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू आहेत. परंतु ही कामे काही प्रभागातच सुरू असल्याने इतर प्रभागांवर अन्याय होत आहे. माझ्या प्रभागात विकासकामांसाठी गेल्या दोन वर्षांत 1 ऊपयाही पालिकेने मंजूर केलेला नाही. अशी सापत्निक वागणूक का म्हणून? असा जोरदार प्रश्न उदय मडकईकर यांनी महापौर मोन्सेरात यांना विचारला. प्रभागाच्या विकासासाठी जनतेने आम्हाला निवडून दिले आहे, याची जाणीव ठेवून प्रभागाच्या विकासासाठी निधी मंजूर करावा आणि तो किती दिवसांत मंजूर होईल, अशी विचारणा मडकईकर यांनी करताच आपण विकासाच्या आड येत त्वरित निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासन महापौर मोन्सेरात यांनी नगरसेवक मडकईकर यांना दिले.
‘तो’ नगरसेवक कोण?
पाटो येथे प्रख्यात बिल्डराकडून इमारत प्रकल्प उभारला जात आहे. हे काम सुरू असताना बांधकाम कंपनीने रस्त्यावरच कार्यालय थाटल्याने याला स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याने आक्षेप घेतला. त्यावर एका नगरसेवकाला पाच लाख ऊपये देऊन मंजुरी मिळविल्याचे संबंधित कंपनीने सामाजिक कार्यकर्त्याला सांगितले. याबाबत त्याने नगरसेवकांना विचारल्याने हा विषय आजच्या बैठकीत आला. पाच लाख ऊपये घेतलेल्या नगरसेवकाचे नाव उघड करावे. या कामासाठी पैसे घेण्यास कोणत्या नगरसेवकाला सांगण्यात आले, याची माहिती महापौरांनी द्यावी, अशी मागणी करून काही काळ कामकाज बंद पाडले.









