दीपक करमळकर यांचे प्रतिपादन : गोसासे मंडळाच्या मासिक ‘काव्यसंध्या’ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद
पणजी : मनातील उत्कट भावना कागदावर उतरविण्याची प्रक्रिया म्हणजे कविता. जी कमी शब्दांत खूप काही सांगून जाते. सामान्य श्रोत्याला भुरळ घालण्याची क्षमता असलेली कविता ही यशाची गुरुकिल्ली असून आज गोव्यासाठी उत्तम काव्यनिर्मिती मराठी कवी कवयित्रींकडून होत आहे. ही काव्यक्षेत्रासाठी आनंदाची आणि उत्कर्षाची बाब असल्याचे मत मागास जमात महामंडळाचे आयुक्त दीपक करमळकर यांनी केले. गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या मासिक काव्यसंध्या या कार्यक्रमात ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काव्यसंध्येचे अध्यक्ष तथा पत्रकार राजू भिकारो नाईक, संस्थेचे अध्यक्ष रमेश वंसकर उपस्थित होते.
गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात राजू भिकारो नाईक यांनी आपल्या निवडक कविता सादर केल्या. उदयोन्मुख कवी, कवयित्रींनी काव्य या विषयावर जस्तीजास्त वाचन व चिंतन करावे. आपली कविता कसदार वाचनीय आणि सौंदर्यपूर्ण होईल, यासाठी ज्येष्ठ कवींकडून मार्गदर्शन घ्यावे. कविता ही हृदयातून आली पाहिजे, असे ते म्हणाले. या काव्यसंध्येमध्ये गोव्यातील प्रतिथयश कवी कवयित्रींनी भाग घेतला. त्यामध्ये विनोद नाईक, प्रकाश तळवडेकर, शोभा धुमस्कर, पौर्णिमा देसाई, अक्षता किनळेकर, अशोक लोटलीकर, दामोदर वंसकर, दुर्गाकुमार नावती, राजमोहन शेटये, आदेचा समावेश होता. रमेश वंसकर यांनी स्वागत कले. राजमोहन शेटये यांनी सूत्रसंचालन केले. तर विठ्ठल गावस यांनी आभार मानले.









