फिरंगाई तालमीचा पुढाकार; प्रजासत्ताक दिनी विविध तालीम, मंडळांचे फुटबॉलपटू, व्यवस्थापकांच्या उपस्थितीत ध्वजवंदन
कोल्हापूर प्रतिनिधी
आपापल्या पेठां-पेठांचा इतिहास आणि संस्कृती जपत एकमेकांच्या हातात हात घालून कोल्हापुरी फुटबॉलच्या विकासासाठी लढण्याचा, व्देष, मत्सर सोडून फुटबॉल संघांची एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार कोल्हापुरी फुटबॉल संघातील खेळाडू, व्यवस्थापकांनी प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वजाला वंदन करून केला.
शिवाजी पेठेतील फिरंगाई तालमीच्या वतीने आणि शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या पुढाकाराने प्रजासत्ताक दिनी शहरातील पेठां-पेठांतील फुटबॉल संघांच्या प्रमुखांना ध्वजवंदनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांत कोल्हापुरी फुटबॉलमध्ये ज्या पद्धतीने खेळातील ईर्ष्या सोडून व्देष, मत्सराचे वातावरण निर्माण झाले आहे. ते दूर करून एकजुटीचे, विकासाचे वातावरण तयार व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविल्याचे यावेळी रविकिरण इंगवले यांनी सांगितले. उपक्रमाला शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी नारळ फोडून सुरूवात केली. तटाकडील तालीम मंडळाचे अध्यक्ष भाजप नेते महेश जाधव यांनी इंगवले यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. प्रॅक्टीस क्लबचे श्रीकांत माने, बालगोपालचे संघ व्यवस्थापक बाबु पाटील, पाटाकडीलचे संघ व्यवस्थापक नलवडे, सुजित चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. यावेळी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू रिची फर्नांडिस, दिलबहारचा स्टार फुटबॉलपटू सचिन पाटील, सुकुमार लाड, अमर सासने, शिवतेज खराडे, निखिल कोराणे, रहिम हकीम, बंडा साळुंखे, सुनील पोवार, बाळू पाटील, धनाजी सूर्यवंशी, बाजीराव नाईक, बबलू चव्हाण, सुनील चव्हाण, रवि दळवी, युवराज पाटील, राजू हांडे, सर्वेश कवलेकर, संदीप भोसले यांच्यासह संघ व्यवस्थापक, कर्णधार, पंच आणि फुटबॉलप्रेमी उपस्थित होते.