पुणे / प्रतिनिधी :
राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी लहान वयात एक विश्वासार्हता निर्माण केली आहे. तसेच ते कोणत्याही विषयावर माहितीच्या आधारे बोलतात आणि त्यांना कधीही विधान मागे घ्यावे लागले नाही. त्यामुळे फडणवीस यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवा, अशी प्रतिक्रिया पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर दिली.
मविआ सरकारचा मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना पाटील बोलत होते. पाटील म्हणाले, माझ्या सारख्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धडा शिकला पाहिजे. मी निरागसपणे काहीतरी म्हणतो आणि माझ मन मोठे असल्याने दिलगिरीही व्यक्त करतो. त्यामुळे तुम्हाला फार काळ आंदोलन करण्याची संधी मी देत नाही. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितले आहे. त्यावर विश्वास ठेवला पाहिजे.
जयंत पाटलांच्या विधानाला काही अर्थ नाही
राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी अजित पवार यांनी पहाटेचा शपथ विधी करण्याचा निर्णय घेतला. या जयंत पाटील यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर बोलताना पाटील म्हणाले, अशा प्रकाराचे गौप्यस्फोट त्या त्या वेळी का केले जात नाही. त्यामुळे उशिरा सुचलेल्या शहाणपणाला, उशिरा मिळालेल्या माहितीला काहीच अर्थ नाही. संदर्भ नसलेल्या गोष्टी झालेल्या असतात. त्यामुळे याला काही अर्थ नसल्याचे सांगत जयंत पाटील यांना पाटील यांनी टोला लगावला.
31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारी रोजी दिल्लीतून उमेदवार घोषित होतील
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवाराबाबत नावाची यादी तयार झाली आहे. ती यादी केंद्राच्या समितीकडे आम्ही पाठविणार आहोत. केंद्रीय समितीची 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारी रोजी बैठक घेईल. त्यावेळी आमच्या यादीवर निश्चित विचार करतील. त्यावर आम्हाला चार वेळा प्रश्न विचारले जातील आणि दिल्लीतून 31 किंवा 1 तारखेला नावाची घोषित करतील, असे त्यांनी सांगितले.