पुणे / प्रतिनिधी :
लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळावे, विधानपरिषदेत स्थान मिळावे. आमच्या पक्षाला निर्णय प्रक्रियेत विचारात घेण्यात यावे तसेच महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका लवकर घ्याव्यात. जेणेकरून जिल्हा आणि तालुका स्तरातील कार्यकर्त्यांना त्यामुळे सत्तेत सहभागी होता येईल, अशी अपेक्षा रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>>> प्रकाश आंबेडकरांनी शब्द जपून वापरायला हवेत- संजय राऊत
शिर्डी येथे 10 मे रोजी रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. तसेच नुकतेच महाबळेश्वर येथे पक्षाची कार्यकारणी बैठक व चिंतन शिबिर आयोजित केले होते, त्या पार्श्वभूमीवर आठवले बोलत होते.
आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीला शिवशक्ती व भीमशक्ती युती म्हणता येणार नाही. कारण खरी भीमशक्ती आमच्यासोबत आहे. त्यामुळे ठाकरे आणि आंबेडकर यांची युती यशस्वी होणार नाही, असेही आठवले म्हणाले.
भाजपा संविधान बदलणार, या अफवा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान टिकवणारे आहेत. त्यांनी अनेक योजना दलित समाजासाठी आणल्या आहेत. तसेच इंदू मिल स्मारक अथवा इतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे विषय तत्काळ मार्गी लागत आहेत. त्यामुळे खरी भीमशक्ती आमच्या पाठीशी असल्याचे आठवले यांनी सांगितले. पुण्यातील कसबा आणि चिंचवड या विधानसभेच्या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .
अधिक वाचा : धक्कादायक! भाजप नेत्याने कुटुंबासह केलं विष प्राशन; चौघांचा मृत्यू