ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुलाच्या आजारपणाला कंटाळून मध्यप्रदेशातील भाजप नेते संजीव मिश्रा यांनी पत्नी आणि दोन मुलासंह विषप्राशन करून आत्महत्या केली. मिश्रा यांनी आत्महत्येपूर्वी फेसबुक पोस्ट केली आहे, त्यात मुलाच्या आजारपणाचा उल्लेख आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिश्रा यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, “माझा मुलगा मस्कुलर डिस्ट्रॉफी आजाराने त्रस्त आहे. शत्रुच्या मुलांनाही देवाने असा आजार देऊ नये.” मिश्रा यांच्या नातेवाईकाने ही पोस्ट पाहिल्यानंतर ते त्यांच्या घरी पोहचले. स्थानिकांच्या मदतीने त्यांच्या घराचा दरवाजा तोडला असता ते जमिनीवर पडलेले दिसले. अनमोल आणि सार्थक या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. तर संजीव आणि त्यांची पत्नी श्वास घेत होती. दोघांनाही तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान या दोघांचाही मृत्यू झाला.
अधिक वाचा : भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू
दरम्यान, मिश्रा यांच्या खोलीत विषाचा बॉक्स आणि एक सुसाईड नोटही आढळून आली आहे. संजीव मिश्रा यांचा मोठा मुलगा अनमोल गेल्या आठ वर्षांपासून मस्कुलर डिस्ट्रॉफी या आजारानं त्रस्त होता, त्यामुळं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचे सीएसपी संजय पांडे यांनी सांगितले.