पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 फरकाने विजय
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशात चालू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील बुधवारी झालेल्या थरारक उपांत्यपूर्व सामन्यात जर्मन संघाने नेहमीप्रमाणे पिछाडीवरून उसळी घेत आक्रमक इंग्लिश संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असे हरवले. संपूर्ण सामन्यात बहुतांश वेळ इंग्लंडने वर्चस्व गाजविले, परंतु शेवटच्या दोन मिनिटांत दोन गोल करून जर्मनीने परिस्थिती बदलली. आता उपांत्य फेरीत जर्मनीची गांठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे.
सामन्याच्या सुरुवातीपासून इंग्लंडने वर्चस्व गाजविताना चेंडूवर जास्तीत जास्त नियंत्रण ठेवून जर्मन संघाला चकीत केले. 12 व्या मिनिटाला झाशारी वॉलेसने गोल करून इंग्लंडला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. हॉकी क्रमवारीत इंग्लंडहून वरच्या चौथ्या स्थानावर असलेल्या जर्मनीने मध्यंतरापूर्वी बरोबरी साधण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण इंग्लंडच्या आक्रमक खेळाने त्यांना यशस्वी होऊ दिले नाही. शिवाय 33 व्या मिनिटाला लायम अॅन्सेलने जर्मन गोलरक्षकाला चकवून आघाडी 2-0 अशी वाढविली.
यामुळे इंग्लंडच्या आक्रमणाची धार वाढली. त्यातच जर्मनीच्या खिस्तोफर रूहरला पिवळे कार्ड दाखविण्यात आल्याने पाच मिनिटे त्यांना दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले. पण याचा फायदा जर्मनीने इंग्लंडला उठवू दिला नाही. सामना संपण्यास आवघी काही मिनिटे शिल्लक असताना रूहरने हाणलेला पेनल्टी स्ट्रोक गोलखांबाला आदळल्यानंतर जर्मनीची वाटचाल संपुष्टात येते की काय असे वाटत होते. पण त्यांच्या मॅट क्रॅमबूशने पिछाडी एका गोलाने कमी केली आणि शेवटच्या दोन मिनिटांत पेनल्टी स्ट्रोकचे गोलात रूपांतर करून सामना बरोबरीत आणला.
त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडच्या जेम्स आल्बेरी, वॉलेस, फिल रॉपर, तर जर्मनीच्या निकलस वेलन, हेन्स म्युलर, थिएस प्रिन्झ, ख्रिस्तोफर रूहर यांनी गोल केले. इंग्लंडतर्फे हाणलेला तिसरा पेनल्टी शूट डेव्हिड गोल्डफिल्डला गोलामध्ये रूपांतरित करता आला नाही, तर शेवटची शूट त्यांच्या लियाम अॅन्सेल गमावली.
नेदरलँड्सकडून दक्षिण कोरियाचा 5-1 धुव्वा
विश्वचषक स्पर्धेत बुधवारी सायंकाळी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीतील दुसऱया सामन्यात नेदरलँड्सचे आव्हान दक्षिण कोरियासाठी खूपच जड गेले. मागच्या सामन्यात अर्जेंटिनाचा पराभव करणाऱया कोरियन संघाकडून अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु डच संघाने निर्विवाद वर्चस्व गाजविताना 5-1 फरकाने लढत जिंकून विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत त्यांची गांठ आता बेल्जियमशी पडणार आहे.
पहिल्या सत्रात एकाही गोलाची नोंद होऊ शकली नाही. त्यानंतर दुसऱया सत्रापासून नेदरलँड्सने आपले वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. त्यांच्या कोएन बिजेनने खाते उघडले. त्यानंतर तिसऱया सत्रात सर्वोत्तम कामगिरी करताना त्यांनी सहा मिनिटांच्या अंतरात दोन गोल केले. आधी पेनल्टी कॉर्नरवर परतलेला चेंडू बिजेनने गोलमध्ये फटकावला, तर ब्लॉक जस्टेनने आघाडी 3-0 वर नेली. कोरियाला त्यानंतर लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. पण त्याचा फायदा त्यांना उठवता आला नाही. चौथ्या सत्रात व्हॅन हेजनिंगन स्टीजन, बेन्स टय़ुन यांनी प्रत्येकी एक गोल करत नेदरलँड्सची आघाडी पाच गोलांवर नेली, तर याच सत्रात कोरियासाठी सेओ इनवूने त्यांचा एकमेव गोल केला.
चेंडू लागून पंच जखमी
या सामन्यात पेनल्टी कॉर्नरवर हाणलेला चेंडू जर्मन पंच बेन गोएंटगेन यांच्या चेहऱयावर आदळून ते जखमी झाल्याने त्यांना ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी मैदानाबाहेर न्यावे लागले. ही घटना 28 व्या मिनिटाला घडली. यावेळी दक्षिण कोरियाच्या एका खेळाडूचा ड्रग फ्लिक नेदरलँड्सच्या खेळाडूच्या स्टिकला लागून चेंडू उसळला आणि गोलपोस्टपासून काही मीटर अंतरावर उभ्या असलेल्या पंचाच्या चेहऱयावर आदळला. गोएंटगेन वेदना होऊन खाली पडल्यावर त्यांचे सहकारी पंच आणि वैद्यकीय कर्मचारी त्यांच्या मदतीसाठी धावले. नंतर त्यांच्या जागी सामन्यासाठीचे राखीव पंच भारताचे रघू प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली.









