वृत्तसंस्था/ दुबई
भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने वर्षातील सर्वोत्तम टी-20 क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला. मागील वर्षी त्याने चमकदार प्रदर्शन केल्याने त्याची या पुरस्कारासाठी आयसीसीने निवड केली. बुधवारी आयसीसीने या पुरस्कारांची घोषणा केली. असोसिएट संघांत नामिबियाचा गेरार्ड इरासमुस व यूएईची ईशा ओझा यांना सर्वोत्तम क्रिकेटपटूचे पुरस्कार जाहीर झाले.
मागील वर्षी सूर्याने फलंदाजीत धडाकेबाज प्रदर्शन करीत अनेक विक्रम नोंदवले. एका कॅलेंडर वर्षात टी-20 मध्ये एक हजारहून अधिक धावा जमविणारा तो केवळ दुसरा फलंदाज असून वर्षातील तो सर्वाधिक धावा जमविणारा फलंदाज बनला. त्याने एकूण 1164 धावा झोडपताना 187.43 चा जबरदस्त स्ट्राईकरेट राखला. 31 सामन्यात त्याने 46.56 च्या सरासरीने त्याने या धावा फटकावल्या. वर्षभरात त्याने एकूण 68 षटकारांची आतषबाजी करीत असा विक्रम करणारा तो पहिला फलंदाज बनला. त्याने 2 शतके व 9 अर्धशतके नोंदवली. भारताचा तो आता प्रमुख हिटर बनला आहे. ऑस्ट्रेलियात झालेली टी-20 विश्वचषक स्पर्धा त्याने आपल्या तुफानी फटकेबाजीने गाजवली. त्याने जवळपास 60 धावांच्या सरासरीने 6 डावांत 3 अर्धशतके नोंदवली. त्यानेच या स्पर्धेत 189.68 चा सर्वाधिक विक्रमी स्ट्राईकरेट नोंदवला.
विश्वचषक स्पर्धेनंतरही त्याने आपला फॉर्म कायम राखत न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत दुसरे शतक नोंदवले. यावर्षीही त्याने एक शतक नोंदवले आहे. याशिवाय रेटिंगमध्येही त्याने वैयक्तिक सर्वाधिक 890 गुण मिळवित आयसीसी टी-20 मानांकनात पहिले स्थान मिळविले. मागील वर्षी नॉटिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने पहिले संस्मरणीय शतक नोंदवताना 55 चेंडूत 117 धावा झोडपल्या. 3 बाद 31 अशा स्थितीनंतर त्याने भारताला 216 धावांचे उद्दिष्ट गाठून देण्यात मोलाचे योगदान दिले होते.

नामिबियाचा इरासमुस सर्वोत्तम
नामिबियाचा कर्णधार गेरार्ड इरासमुसला आयसीसीने वर्षातील सर्वोत्तम असोसिएट क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर केला. 2021 मध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर मागील वर्षीही त्याने तोच जोम कायम राखताना वनडे व टी-20 मध्ये चमक दाखवली. त्याने कॅलेंडर वर्षात वनडेमध्ये 20 डावांत 1000 धावा जमविल्या. त्याने ओमानविरुद्ध 120 चेंडूत नाबाद 121 धावांची शतकी खेळी करीत संघाला विजय मिळवून दिला. नामिबियाने वर्षभरात 21 पैकी 13 वनडे सामने जिंकले, त्यात इरासमुसने 12 बळी नोंदवले. त्याच्या चमकदार फलंदाजीमुळे नामिबियाला टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलग दुसऱयांदा स्थान मिळविता आले आणि लंकेवर पहिला विजयही त्याच्या नेतृत्वाखली मिळविता आला.
इरासमुसने मागील वर्षी 21 वनडेत 56.23 च्या सरासरीने 956 धावा जमविल्या. त्यात एक शतक व 8 अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत त्याने 27.66 च्या सरासरीने 12 बळी टिपले. तसेच 11 टी-20 सामन्यात त्याने 38.25 च्या सरासरीने व 122.40 च्या स्ट्राईकरेटने 306 धावा जमविल्या, त्यात एक शतक व एका अर्धशतकाचा समावेश आहे. याशिवाय त्याने 6 बळीही मिळविले.

यूएईची ईशा ओझा महिलांत सर्वोत्तम
संयुक्त अरब अमिरातच्या ईशा ओझाने वर्षातील सर्वोत्तम महिला असोसिएट क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला. अष्टपैलू असलेल्या ईशाने मागील वर्षीच्या आधी 23.15 च्या सरासरीने टी-20 मध्ये 463 धावा जमविताना 100.43 चा स्ट्राईकरेट राखला होता. पण 2022 मध्ये तिने केवळ 23 डावांत 700 धावा जमविल्या. तिने अनेक सामन्यात महत्त्वाचे योगदान दिले असून टी-20 विश्वचषक पात्रता स्पर्धेवेळी तिने 1000 धावांचा टप्पाही पार केला.









