पुणे / प्रतिनिधी :
राज्यात गुन्हेगारी वाढत आहे. राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवे. यावर काही न बोलता त्यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले, याचे मला आश्चर्य वाटत आहे. देवेंद्र फडणवीस, ‘आपसे ये उम्मीद न थी, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी निशाणा साधला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न झाले. मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर संजय पांडे यांना महाविकास आघाडीने माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक करण्याची सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांचे विधान हे हास्यास्पद आहे. दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या विधानावर सविस्तर बोलले आहेत. देवेंद्र जी ‘आपस ये उम्मीद न थी’, अशा खोटय़ा नाटय़ा गोष्टी पसरवण्यापेक्षा पुण्यात कोयता गँग, धायरीत गोळीबार झाला, अशा घटना घडल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांनी यावर बोलणे अपेक्षित होते. त्यांना विनम्र विनंती आहे की, पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सगळीकडे गुन्हेगारी वाढत आहे. अशी परिस्थितीवर त्यांनी बोलावे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर मला आश्चर्य वाटले आहे. नागरिकांची सुरक्षा करणे याला त्यांनी प्राधान्य दिले पाहिजे.