सांगली / प्रतिनिधी
मराठी साहित्यातील पहिल्या दलित स्त्री आत्मचरित्राच्या लेखिका शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचे पुण्यात बुधवारी सकाळी ७ वा. वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
माझ्या जल्माची चित्तरकथा या आत्मचरित्राद्वारे लोकप्रिय झालेल्या आणि 1990 साली दूरदर्शन वरून प्रसारित झालेल्या नाजुका या मालिकेतील प्रसिद्ध नायिका पात्र म्हणून पुढे आलेल्या “नाजुका” म्हणून दलित मित्र शांताबाई कृष्णाजी कांबळे यांची ओळख होती. त्या मूळच्या सांगलीच्या. दलित पॅंथरचे दिवंगत संस्थापक प्रा. अरुण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत.
माझ्या जल्माची चित्तरकथा वरील नाजुकि ही दुरदर्शनवरील गाजलेली मालिका म्हणजे त्यांचे आत्मचरीत्रच होते. त्या कथेतील “नाजुका” हे चरित्र नायिकेचे पात्र प्रचंड गाजले आणि त्याला महाराष्ट्रभरातून तुफान प्रतिसाद लाभला होता. शांताबाई कृष्णा कांबळे सध्या त्यांची कन्या मगंल नारायण तिरमारे यांच्या बरोबर औंध ( पुणे ) येथे राहत होत्या. त्यांना शासनाचा दलितमित्र बहुमानही लाभला होता. अंत्यविधी बुधवार सायंकाळी कोपरखैरणे, नवी मुंबई येथे होणार आहे. माज्या जल्माची चित्तरकथा हे त्याचं आत्मवृत्त विशेष गाजलं. पहिल्यांदा मार्च १९८३ साली ते पूर्वा मासिकात आलं, त्या आधी साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांनी या पुस्तकाला १९८२ आली अनुदान दिल आणि ते पूर्वा प्रकाशना तर्फे १७ जून १९८६ रोजी पुस्तक रूपात आलं.
शांताबाई यांचा जन्म १ मार्च १९२३ रोजी मु. पो. आटपाडी , जि. सांगली येथे झाला .शिक्षिका म्हणून सोलापूर जिल्हा स्कूल बोर्डात त्यांची १६ जानेवारी १९४२ रोजी नियुक्ती झाली. त्या जिल्ह्यातील पहिल्या दलित शिक्षिका ठरल्या.
१९५२ साली पुण्याच्या विमेन्स कॉलेजमधून ट्रेनिंग कॉलेज वर्ष दुसरे वर्ष त्या उत्तीर्ण झाल्या. काही काळ सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी काम केले.
२८ फेब्रुवारी १९८१ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर मराठी वाङ्मयातील दलित स्त्रीचे पहिलेच आत्मकथन त्यांनी लिहिले.
‘नाजुका’ ह्या नावाने मुंबई दूरदर्शनवर चित्रमालिकेच्या स्वरूपात १० ऑगस्ट १९९० पासून हे आत्माकथन सादर झाले. फ्रेंच,इंग्रजी,हिंदी भाषेत पुस्तकरूपाने अनुवाद प्रसिद्ध झाले . ‘फेमिना’ मासिकाच्या काही अंकांतून इंग्रजीतअनुवादित झाले.
त्यांच्या मागे मुले, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्यांचे पती कृष्णाजी नारायण कांबळे (गुरुजी), मी कृष्णा हे त्यांचे आत्मकथन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे , तीरमारे गुरुजी यांचा सहवास त्यांना लाभला. या आत्मकथेवर आधारित “माझ्या जन्माची चित्तरकथा हे नाटक नुकतेच 2022 ला योगेश सोमण दिग्दर्शीत सुरु झाले आहे.