हलगा-मच्छे बायपास प्रकरणात मनाई उठविण्यासाठी खटाटोप
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उच्च दिवाणी न्यायालयाकडे अर्ज दाखल करून मनाई उठविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यावेळी शेतकऱ्यांचे वकील रवीकुमार गोकाककर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास शेतकऱ्यांची बाजू दाखवून दिली. यावेळी प्राधिकरणाच्या वकिलांनी देशाचे नुकसान होत आहे, तेव्हा ही मनाई उठवावी, अशी मागणी केली. जणू शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्यांनी केला आहे. त्याविरोधात शेतकऱ्यांचे वकील रवीकुमार गोकाककर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास शेतकऱ्यांच्या सर्व बाबी दाखवून दिल्या. हा रस्ता कसा चुकीचा आहे, त्या जमिनी किती महत्त्वाच्या आहेत, जवळपास 1 तास युक्तिवाद त्यांनी केला आहे. वास्तविक न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी केला होता. मात्र अॅड. रवीकुमार गोकाककर यांनी त्यांचे म्हणणे कसे चुकीचे आहे, हे दाखवून दिले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांची डाळ शिजत नसल्यामुळे शेवटी त्यांनी आपले म्हणणे मांडण्यास मुदत मागितली. त्यामुळे उच्च दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी 31 जानेवारी रोजी म्हणणे मांडण्यास मुभा दिली आहे. उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांची बाजू उचलून धरली आहे. सदर दावा हा योग्य असून तो खटला चालला पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले असता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी हा दावाच योग्य नाही तो फेटाळून लावावा, अशी मागणी केली होती.
मनाई उठविण्यासाठी धडपड
मात्र अॅड. गोकाककर यांनी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांना मुदत मागून घ्यावी लागली. एकूणच सदर मनाई उठविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची धडपड सुरू झाली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये शेतकऱ्यांची बाजू खंबीरपणे मांडल्यामुळे चांगलीच समस्या निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.









