अनर्थ टाळण्यासाठी गॅरेज चालकांनी केली रस्त्याची स्वच्छता
प्रतिनिधी /बेळगाव
जुना धारवाड रोड येथील छत्रपती शिवाजी उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वाराजवळ वाळू पडली आहे. याठिकाणी दुचाकी वाहनधारक घसरून पडण्याचा प्रकार गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. पण रस्त्याची स्वच्छता करण्याची दखल महापालिकेने घेतली नाही. मंगळवारी दुपारी एक दुचाकी वाहन घसरून पडल्याने येथील गॅरेज चालकांनी रस्त्यावरील वाळू काढून रस्ता स्वच्छ केला.
रुपाली थिएटर परिसरात उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वाराजवळ वाळूने भरलेल्या वाहनातील वाळू कोसळली होती. त्यामुळे याठिकाणी दहा ते पंधरा बुट्या वाळू रस्त्यावर पडली होती. काँक्रीटच्या रस्त्यावर वाळू पडल्याने दुचाकी वाहने घसरून पडण्याचे प्रकार वाढले. त्यामुळे येथील गॅरेज चालकांनी सदर वाळू भरून बाजूला टाकली. तरीदेखील रस्त्यावर पसरलेल्या वाळूमुळे दररोज एक-दोन वाहने घसरून पडत आहेत. मंगळवारी दुपारी रस्त्यावरून माणिकबागकडे जाणारे दुचाकी वाहन घसरून पडल्याने वाहनावरील नागरिकांना दुखापत झाली. गॅरेज चालकांनी त्या वाहनधारकांना सावरले. त्यानंतर रस्त्यावर पसरलेली सर्व वाळू भरून बाजूला टाकली. वास्तविक पाहता रस्त्याची स्वच्छता करणाऱ्या महापालिकेने असे प्रकार टाळण्यासाठी काँक्रीटच्या रस्त्यावर खडी, वाळू किंवा आईल पडले असल्यास स्वच्छ करणे आवश्यक आहे. पण याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वाहने घसरून पडण्याचे प्रकार वाढले होते. कोणताही अनर्थ घडू नये याची दक्षता घेण्याच्यादृष्टीने येथील गॅरेज चालकांनीच रस्त्याची स्वच्छता केली. याबद्दल गॅरेज चालकांचे आभार व्यक्त करण्यात आले.









