महिला गटात साऊथ सेंट्रल रेल्वे संघ विजेता : निपाणीत ऑल इंडिया ए ग्रेड कबड्डी स्पर्धा चुरशीने : प्रेक्षकांचा अलोट प्रतिसाद

महेश शिंपुकडे /निपाणी
जोल्ले ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया ए ग्रेड कबड्डी स्पर्धा गेल्या चार दिवसापासून सुरू होत्या. पुरुष गटातून इंडियन नेव्ही संघाने रेड आर्मी संघाचा पराभव करत अजिंक्मयपद पटकावले. महिला गटातून साऊथ सेंट्रल रेल्वे या संघाने वेस्टर्न रेल्वे मुंबई संघाचा पराभव करत अजिंक्मयपद पटकावले. विजेत्या संघांना मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले, युवा नेते बसवप्रसाद जोल्ले, ज्योतीप्रसाद जोल्ले, प्रिया जोल्ले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते चषक व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

चार दिवस चाललेल्या कबड्डी स्पर्धा ऑल इंडिया ए ग्रेड दर्जाच्या असल्याने निपाणीसह परिसरातील कबड्डी शौकिनांसाठी ही पर्वणीच ठरली. बोचऱया थंडीत देखील मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेले सामने पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींकडून उत्साह दिसून येत होता. उपांत्य फेरीमध्ये पुरुष गटात इंडियन नेव्ही आणि एमडीयू रोहतक हरियाणा संघामध्ये सामना झाला. यात इंडियन नेव्ही संघाने 45 गुण तर एमडीयू रोहतक संघाला फक्त 37 गुण करता आले. यामुळे इंडियन नेव्ही संघाने 8 गुणांनी विजय मिळवत अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला. दुसरा उपांत्य सामना रेड आर्मी विरुद्ध ग्रीन आर्मी संघादरम्यान झाला. यामध्ये रेड आर्मी संघाने 32 गुण तर ग्रीन आर्मी संघाला अवघे 19 गुण करता आले. यामुळे रेड आर्मी संघाने 13 गुणांनी एकतर्फी विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश
केला.
महिला गटातून पालम स्पोर्ट्स विरुद्ध साऊथ सेंट्रल रेल्वे संघादरम्यान सामना झाला. यामध्ये साउथ सेंट्रल रेल्वे संघाने 34 गुण तर पालम स्पोर्ट्स संघाला फक्त 19 गुण करता आले. यामुळे साऊथ सेंट्रल रेल्वे संघाने हा सामना एकतर्फी 15 गुणांनी जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला. दुसरा उपांत्य सामना वेस्टर्न रेल्वे मुंबई विरुद्ध सेंट्रल रेल्वे संघादरम्यान झाला. चुरशीने झालेल्या या सामन्यात वेस्टर्न रेल्वे संघाने 36 गुण केले तर सेंट्रल रेल्वे संघाने विजयाची झुंज देताना 31 गुण केले. वेस्टर्न रेल्वे मुंबई संघाने 5 गुणांनी विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
पुरुष गटातून अंतिम सामना इंडियन नेव्ही विरुद्ध रेड आर्मी संघात झाला. हा सामना मोठय़ा चुरशीने दोन्ही संघाकडून खेळण्यात आला. समसमान गुण मिळवत पुढे चालणारा सामना इंडियन नेव्ही संघाने 44 गुण मिळवित रेड आर्मी संघाला 5 गुणाने हरवत जोल्ले ग्रुप ऑल इंडिया ए ग्रेड चषकावर आपले नाव कोरले. या संघाला तीन लाखाचे रोख बक्षीस व चषक देऊन गौरवण्यात आले. उपविजेत्या रेड आर्मी संघाला दोन लाखाचे रोख बक्षीस व चषक देऊन गौरविण्यात आले. एमडीयू रोहतक हरियाणा संघाला तृतीय तर ग्रीन आर्मी संघाला चतुर्थ क्रमांक देताना दोन्ही संघांना प्रत्येकी एक लाखाचे रोख बक्षीस व चषक देऊन गौरविण्यात आले.
महिला गटातून साऊथ सेंट्रल रेल्वे विरुद्ध वेस्टर्न रेल्वे मुंबई संघादरम्यान अंतिम सामना झाला. दोन्ही संघ एकास एकप्रमाणे शेवटपर्यंत झगडत राहिले. दोन्ही संघांना त्यांच्या सामूहिक प्रयत्नातून समसमान 31 गुण मिळाले. यामुळे पंचांच्या निर्णयानुसार दोन्ही संघांना पाच-पाच रेड देण्यात आल्या. यामध्ये साऊथ सेंट्रल रेल्वे संघाने 4 गुण तर वेस्टर्न रेल्वे संघाला मात्र दोनच गुण करता आले. यामुळे अधिकच्या दोन गुणांच्या जोरावर साउथ सेंट्रल रेल्वे संघाने जोल्ले ग्रुप ऑल इंडिया ए ग्रेड चषकावर नाव कोरले. विजेत्या संघाला 2 लाखाचे रोख बक्षीस व चषक देऊन गौरवण्यात आले. उपविजेता वेस्टर्न रेल्वे संघाला एक लाखाचे रोख बक्षीस व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. पालम स्पोर्ट्स दिल्ली व सेंट्रल रेल्वे संघाला तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे प्रत्येकी 50,000 रुपयांचे बक्षीस व चषक देऊन सन्मानित करण्यात आले
चार दिवसांच्या या कबड्डी स्पर्धेत 80 संघ सहभागी झाले होते. विविध नामवंत संघाच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेतून पुरुष गटातून बेस्ट रायडर-पवन (एमडीयू रोहतक हरियाणा), बेस्ट कॅचर-लकी शर्मा (रेड आर्मी), बेस्ट ऑल राऊंडर-भारत हुडा (इंडियन नेव्ही) यांना तर महिला गटातून बेस्ट रायडर-सोनाली शिंदे (वेस्टर्न रेल्वे), बेस्ट कॅचर रीटी (पालम स्पोर्ट्स दिल्ली), बेस्ट ऑल राऊंडर-पूजा (साउथ सेंट्रल रेल्वे) यांना 32 इंची एलईडी टीव्ही देऊन गौरव करण्यात आला.









