भारत-न्यूझीलंड तिसरा व शेवटचा वनडे सामना आज
वृत्तसंस्था/ इंदोर
भारत व न्यूझीलंड यांच्यातील तिसरी व शेवटची वनडे लढत येथे आज मंगळवारी होत असून मालिकेत क्लीन स्वीप साधण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल. मध्यफळीवर पुन्हा एकदा फोकस राहणार असून चांगले प्रदर्शन करण्यास तेही उत्सुक आहेत. मालिका याआधीच जिंकली असल्याने भारतीय संघव्यवस्थापन या सामन्यात गोलंदाजांना रोटेट करण्याची शक्यता आहे. सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होणार असून स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून त्याचे थेट प्रक्षेपण होईल.
सलामीवीर शुबमन गिल पूर्ण फॉर्ममध्ये असून त्याने पहिल्या सामन्यात द्विशतक तर दुसऱया सामन्यात 40 धावांचे योगदान दिले. कर्णधार रोहित शर्माही बऱयापैकी फॉर्ममध्ये आहे. मात्र मालिकेत विजयी आघाडी घेतली असली तरी गिल व रोहित यांच्याव्यतिरिक्त इतरांना मोठे योगदान देता आलेले नाही, याची जाणीव संघाला आहे. इशान किशन, हार्दिक, सूर्यकुमार यासारख्या अन्य खेळाडूंची चाचणी झालेली नसल्याने या सामन्यात त्यांना सरावाची चांगली संधी आहे.
डावखुऱया स्पिनर्सविरुद्ध कोहलीची समस्या पुन्हा एकदा समोर आली असून मिशेल सँटनरकडून तो वारंवार बाद होताना दिसून आला आहे. चार डावांत 3 शतके नोंदवल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही डावांत सँटनरने त्याला स्वस्तात बाद करीत त्याची त्रुटी उघडकीस आणली. विश्वचषक स्पर्धा जवळ आली असल्याने त्याला या त्रुटीवर लवकरात लवकर तोडगा काढावा लागेल आणि त्यासाठी तो निश्चितच प्रयत्न करेल.
श्रेयस अय्यरच्या गैरहजेरीत सूर्यकुमारकडून अखेरच्या टप्प्यात फटकेबाजीची अपेक्षा केली जात आहे. पण टी-20 गाजविणाऱया या खेळाडूला पहिल्या सामन्यात तसे करणे जमले नाही. अष्टपैलू हार्दिक पंडय़ाची बॅटही अलीकडे चमकलेली नाही. लंकेविरुद्ध तो पूर्णतः अपयशी ठरला तर न्यूझीलंडविरुद्ध त्याने अजून प्रभाव दाखविलेला नाही. या मालिकेनंतर टी-20 मालिका होणार असल्याने तसेच त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध मालिका होणार असल्याने संघव्यवस्थापन काही खेळाडूंना विश्रांती देत रजत पाटीदारला पदार्पणाची संधी देईल, अशी अपेक्षा आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये तसेच आयपीएलमध्ये पाटीदारने प्रभावी कामगिरी केली आहे.

या सामन्यात गोलंदाजीच्या विभागातही काही बदल होण्याची अपेक्षा आहे. वेगवान गोलंदाज उमरान मलिकला पुन्हा संधी मिळेल किंवा स्पिनर यजुवेंद्र चहल कुलदीप यादवच्या जागी खेळवेले जाईल. या दोघांनाही पहिल्या दोन सामन्यात संधी मिळाली नाही. त्यामुळे वनडे वर्ल्ड कपचा विचार करून त्यांना संधी देत खेळाडूंच्या वर्कलोडवरही नजर ठेवली जाईल. पहिल्या सामन्यात 6 बाद 131 अशी स्थिती असतानाही भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला तीनशेहून अधिक धावा करण्याची संधी देण्याची चूक केली. पण अखेरच्या टप्प्यात वेगवान गोलंदाजांनी भेदक मारा करीत भारताला सामना जिंकून देण्यात यश मिळविले. शमी, सिराज, हार्दिक यांनी व्यवस्थित मारा केला तर स्पिनर्सनीही बऱयापैकी प्रदर्शन केले आहे.
न्यूझीलंड संघ मात्र मालिका गमावली असली तरी शेवटच्या सामना जिंकून मालिका संपवित मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करेल. पण त्यासाठी फलंदाजीतील उणिवा त्यांना दूर कराव्या लागतील. गेल्या 30 डावांत न्यूझीलंडच्या पहिल्या सहा फलंदाजांनी फक्त सातवेळा 40 किंवा त्याहून अधिक धावा जमविल्या आहेत. फक्त मायकेल ब्रेसवेलने या सर्वांत प्रभावी प्रदर्शन केले असून हैदराबादमधील सामन्यात त्याने सँटनरसमवेत आपल्या संघाला विजयाच्या अगदी समीप आणले होते. येथील होळकर स्टेडियमची सीमारेषा लहान असल्याने तसेच खेळपट्टीवर बाऊन्स असल्याने ती फलंदाजांसाठी अनुकूल ठरणारी आहे. त्यामुळे धावा रोखण्यासाठी गोलंदाजांना बरेच कष्ट घ्यावे लागणार आहेत.
संभाव्य संघ ः भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), गिल, इशान किशन, कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत, हार्दिक पंडय़ा, सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, चहल, कुलदीप यादव, शमी, सिराज व उमरान मलिक.
न्यूझीलंड ः टॉम लॅथम (कर्णधार), फिन ऍलेन, डग ब्रेसवेल, मायकेल ब्रेसवेल, चॅपमन, कॉनवे, जेकब डफी, फर्ग्युसन, डॅरील मिशेल, निकोल्स, ग्लेन फिलिप्स, सँटनर, हेन्री शिपले, ईश सोधी, ब्लेअर टिकनर.
सामन्याची वेळ ः दुपारी 1.30 पासून
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.









