वृत्तसंस्था/ उज्जैन
यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना इंदोरमध्ये मंगळवारी होत आहे. मध्यप्रदेशमध्ये दाखल झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघातील काही क्रिकेटपटूंनी उज्जैनच्या प्रख्यात महाकालेश्वर मंदिराला भेट दिली. भारतीय संघाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज रुषभ पंत याचा काही दिवसापूर्वी अपघात झाला होता. या अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. पंतची प्रकृती झपाटय़ाने सुधारावी यासाठी संघातील खेळाडूंनी श्री महाकालेश्वराला साकडे घातले.
भारतीय संघातील सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर तसेच भारतीय संघाच्या प्रशिक्षक वर्गातील काही सदस्यांनी सोमवारी सकाळी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराला भेट दिली. रुषभ पंतचा 30 डिसेंबर रोजी हा अपघात झाला होता. पंतवर सध्या वैद्यकीय इलाज सुरु आहेत. मुंबईमध्ये त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. भारतीय संघातील क्रिकेटपटूंनी महाकालेश्वर मंदिरात भगवान शंकराचे दर्शन घेत भस्म आरती केली.









