भारताच्या स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, रिचा घोष, रेणुका सिंग यांचा समावेश
वृत्तसंस्था/ दुबई
2022 सालातील आयसीसीतर्फे सर्वोत्तम महिला टी-20 संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली. आयसीसीने निवडलेल्या या संघातील अंतिम 11 खेळाडूंमध्ये भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना, अष्टपैलू दिप्ती शर्मा आणि यष्टीरक्षक व फलंदाज रिचा घोष व वेगवान गोलंदाज रेणुका सिंग यांचा समावेश आहे. न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईनची कर्णधार म्हणून निवड केली आहे. या संघामध्ये ऑस्ट्रेलियाच्या तीन महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
2022 च्या क्रिकेट हंगामात सलामीची फलंदाज स्मृती मानधनाची फलंदाजी चांगलीच बहरली होती. तिने या कालावधीत 33 धावांच्या सरासरीने 594 धावा जमविताना 133.48 स्ट्राईकरेट राखला. गेल्या संपूर्ण वर्षामध्ये तिने 21 डावात 5 अर्धशतके नोंदविली आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील लंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात मानधनाने अर्धशतक झळकविले होते.
भारतीय संघातील अष्टपैलू तसेच फिरकी गोलंदाज दिप्ती शर्माने 2022 च्या क्रिकेट हंगामात 21 गडी बाद केले असून महिलांच्या टी-20 प्रकारात सर्वाधिक गडी बाद करणाऱया गोलंदाजांच्या यादीत तिने संयुक्त तिसरे स्थान मिळविले आहे. शर्माने 18.55 धावांच्या सरासरीने 29 बळी नोंदविले आहेत. तसेच तिने फलंदाजीत या कालावधीत 370 धावा झळकाविल्या असून तिने 37 धावांची सरासरी आणि 136.02 स्ट्राईकरेट राखला. भारताची नवोदित यष्टीरक्षक आणि फलंदाज रिचा घोषने टी-20 प्रकारात 18 सामन्यातून 259 धावा जमविताना 150 पेक्षा अधिक स्ट्राईकरेट राखला आहे. तिने 18 सामन्यात 13 षटकार नोंदविले आहेत.
न्यूझीलंडची सोफी डिव्हाईन हिने 2022 चा क्रिकेट हंगाम चांगलाच गाजविला आहे. या कालावधीत तिने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दर्जेदार संघाविरुद्ध अर्धशतके नोंदविली आहेत. तिने फलंदाजीत 389 धावा तर गोलंदाजीत 13 गडी बाद केले आहेत. तिने 56.12 धावांच्या सरासरीने तसेच 134.43 स्ट्राईकरेटने या धावा जमविल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या बेकमुनी, ऍस गार्डनर आणि ताहिला मॅकग्रा या तीन खेळाडूंचा आयसीसीच्या या संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडची इक्लेस्टोन तसेच लंकेची इनोका रणवीरा यांचाही या संघात समावेश आहे. भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंगनेही प्रभावी कामगिरी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आयसीसी महिला टी-20 संघ – स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, रिचा घोष, बेथ मुनी, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ऍस गार्डनर, ताहिला मॅकग्रा, निदा दार (पाक), सोफी इक्लेस्टोन (इंग्लंड) आणि इनोका रणवीरा (लंका), रेणुका सिंग (भारत).









