सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना पंतप्रधान मोदींचे प्रशंसोद्गार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान अविस्मरणीय आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा गौरव केला आहे. बोस यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केल्यानंतर एका ट्विटर संदेशातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सुभाषबाबू हे ब्रिटीशांचा उग्र पद्धतीने विरोध करण्यासाठी ओळखले जातात. त्यांचा जन्मदिवस हा पराक्रम दिवस म्हणून ओळखला जातो. आमच्या सरकारने नेताजींची विचारसरणी प्रत्यक्षात आणण्याचे ध्येय बाळगलेले आहे, असे प्रतिपादनही पंतप्रधान मोदींनी केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचे आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या संग्रामाचे गुणगान केले. आपल्या अद्वितीय नेतृत्वाने नेताजींनी लोकांचे संघटन केले. देशभक्तीची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा त्यांना दिली. आझाद हिंद सेना स्थापन करुन स्वातंत्र्यासाठी सशस्त्र आंदोलन केले. त्यांचे साहस आणि संघर्ष अनुकरणीय असून सारा देश त्यांचा ऋणी आहे. त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांचे स्मरण आम्हाला सदैव प्रेरणादायी राहील. त्यांचा देशभक्तीचा आदर्श आम्ही आमच्यासमोर ठेवला आहे, असा संदेश अमित शहा यांनी सोमवारी 126 व्या जयंतीनिमित्त दिला आहे.
काँगेसचीही मानवंदना
नेताजींच्या जयंतीनिमित्त काँगेसनेही त्यांचे स्मरण केले आहे. बोस यांनी देशाला मातृभूमीसाठी समर्पण करण्याची प्रेरणा दिली. ‘जय हिंद’ आणि ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजदी दूंगा’ या त्यांच्या घोषवाक्यांनी देशाला जागे केले, असा संदेश काँगेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्विटरवर दिला. भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी बोस यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांना माझी विनम्र मानवंदना, अशा शब्दांमध्ये काँगेस नेते राहुल गांधी यांनीही संदेश दिला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनाही अभिवादन
सोमवारी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचीही जयंती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांनाही ट्विटर संदेशाद्वारे अभिवादन केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मी अनेकदा संवाद केला आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांचे आदरपूर्वक स्मरण करतो. त्यांच्याशी केलेल्या चर्चा नेहमीच मला आठवतात आणि त्यातून मला पेरणा मिळते. बाळासाहेब ठाकरे हे ज्ञानी आणि हजरजबाबी होते. त्यांनी आपले जीवन लोकांच्या कल्याणाकरिता समर्पित केले. यांचे हे समर्पण नेहमी मला मार्गदर्शन ठरत आहे, असे प्रतिपादन त्यांनी संदेशात केले आहे.









