चहुबाजूने धावत असतात वाहने
जर तुम्ही कुठल्याही शहरात राहत असाल तर तेथे चौक असणार. चौक म्हणजेच वेगवेगळय़ा दिशेने येणारे 4 रस्ते परस्परांना छेदत असलेले ठिकाण. चौकाच्या ठिकाणी गोल आकार दिला जातो किंवा एखादा सुंदर पुतळा उभारला जात असतो. परंतु कुठल्याही चौकात घर असल्याचे पाहिले आहे का? अशाप्रकारचे दृश्य वेल्समध्ये दिसून येते.
वेल्सच्या डेनबिगशायरमध्ये एक कुटुंब चौकाच्या मधोमध वास्तव्यास आहे. हे कुटुंब बेघर नसून त्याचे मोठे घर चौकाच्या मधोमध आहे. अशाप्रकारचे दृश्य फारसे कुठे दिसत नसल्याने त्यांचे घर अत्यंत लोकप्रिय ठरले आहे. हे कुटुंब तेथे 1960 पासून वास्तव्यास आहे.

घराचे मालक डेव्हिड जॉन आणि एरियान हॉटसन हे 1960 मध्ये तेथे राहायला आले असता हा भाग सर्वसामान्य ग्रामीण भागासारखा होता, सुमारे 20 वर्षांपर्यंत ते सामान्य जीवन जगत होते, परंतु अचानक एकेदिवशी प्रशासनाने त्यांना घर रिकामी करण्याची सूचना केली. त्यांचे घर नवा चौक निर्माण होणाऱया ठिकाणी असल्याचे प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आले होते, यामुळे पती-पत्नी नाराज झाले आणि घर सोडणार नसल्याचा निश्चय त्यांनी केला.
40 वर्षांपासून हट्ट कायम
त्यांचा हा निर्धार पाहता प्रशासनाने त्यांच्या घरालाच चौकात रुपांतरित केले. आता त्यांचे घर मधोमध असून चहुबाजूनी रस्ते आहेत. अशाप्रकारे ते मागील 40 वर्षांपासून राहत आहेत. या गोष्टीचा त्यांना फारसा फरक पडत नसला तरीही अनेकदा समस्यांना तोंड द्यावे लागते. रस्त्यांवर दिवसभर वाहतूक असल्याने चहुबाजूने गोंगाट असतो. तसेच दुर्घटनांचा धोका सातत्याने असतो.









