बारसह अनेक वाहनांनाही लागली आग : नऊ फ्लॅटसह अनेक घरांच्या काचा फुटल्या एवढे होऊनही स्फाटाचे कारण गुलदस्त्यात
प्रतिनिधी /म्हापसा
येथील डांगी कॉलनीतील ब्रीझ अपार्टमेंटच्या तळमजल्यावर असलेल्या हिल टॉप बार अँड रेस्टॉरंटमध्ये रविवारी पहाटे शक्शिशाली स्फोट होऊन सार परिसर हादरुन गेला. स्फोट एवढा भींषण होता की बारचे शटर सुमारे पन्नास मीटर बाहेर फेकले गेले आणि ते कार तसेच दुचाकींवर पडून त्यांना आग लागून खाक झाल्या. बारमधील भिंत कोसळून पडली. अपार्टमेंटमधील नऊ फ्लॅटच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्यामुळे बरीच मोठी नुकसानी झाली आहे, मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण रविववारी रात्रीपर्यंत गुलदस्त्यात होते.
श्वानपथक तसेच बाँबशोधक पथकही घटनास्थळी दाखल होऊन तपास करण्यात आला. घटनास्थळावरुन काही पुरावे गोळा करण्यात आले आहेत. स्फोटानंतर सर्वत्र काचांचा खच पडला होता. आजुबाजुच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याने त्यांचीही बरीच नुकसानी झाली आहे. काही कारच्या काचा फुटल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. अॅक्टिव्हा दुचाकी जळून खाक झाली, तर बारमध्ये सोडा, बियर, दारुच्या फुटलेल्या बाटल्यांचा खच पडला होता. बारमधील फ्रीज, एसी यंत्रणाही जळून खाक झाली. रस्त्यावरही काचा पडल्या होत्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी रस्ता स्वच्छ केला. बाजूलाच असलेल्या ब्युटी पार्लरच्याही काचा फुटल्या. नॉवेल्टी स्पोर्टसचे मालक एकनाथ नाईक यांच्याही घराच्या काचा फुटल्या. एकंदरीत बारसह अन्य अनेकांचे नुकसान झाले आहे
उशिरापर्यंत सुरु होते बार
हे बार रात्री दोन वाजेपर्यंत चालू होते, असे पोलीस तपासात आढळून आले असून त्यासंबंधीचा अहवाल तयार करुन तो अबकारी खात्याला पाठवून बारचा परवाना रद्द केला जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक जीवबा दळवी यांनी दिली. ते म्हणाले की बारमध्ये काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्या आहेत. ज्वालाग्रही वस्तू जळाल्याचे नमूने सापडले आहेत. आतमध्ये एसी होती, पण तिच्यासाठी स्टेबिलायझर नव्हता.
सिलिंडर न फुटता स्फोट कसला?
आतमध्ये तीन घरगुती स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर सापडले असून ते पुढील तपासासाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठवून देण्यात आले आहेत. कमर्शियल सिलिंडर का वापरले जात नव्हते, याची चौकशी होणार आहे. हे सिलिंडर न फुटता आग कशी लागली, हा मोठा प्रश्न असून पोलीस त्याबाबत कसून शोध घेणार आहेत.
तीन वेगवेगळ्या अंगांनी होतोय तपास
बाँब शोधक पथक तथा फॉरेन्सिक विभागाचे अधिकारी नारायण वाघमारे, सुशांत नाईक, अर्जून कोरगावकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन तपासणी करुन पुरावे गोळा केले. फॉरेन्सिक विभाग आणि पोलीस मिळून तीन वेगवेगळ्या अंगांनी हा तपास करीत आहेत.
रात्री साडेतीन वाजेपर्यंत बार सुरु होते
या घटनेबाबत फॅक्टरी अँड बॉयलर्स खात्याला पत्र लिहून कळविण्यात येणार आहे. सीसी टिव्ही फुटेजवरुन हे बार शनिवारी मध्यरात्रीनंतर 3. 30 वाजेपर्यंत सुरु होते, असे स्पष्ट झाले आहे. या बारकडे केवळ रात्री 11 वाजेपर्यंतचाच परवाना आहे. ही घटना पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली, अशी माहिती मिळाली आहे. स्फोट झाल्यानंतर आगीचे लोळ सर्वत्र पसरले होते, ते सीसी टिव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.
अशाप्रकारची राज्यातील पहिलीच घटना : बॉस्को फेर्रांव

अशाप्रकारे स्फोट होऊन आग लागण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असावी, अशी माहिती म्हापसा अग्निशमन दलाचे अधिकारी बॉस्को फेर्रांव यांनी दै. तरुण भारतला दिली. एवढा स्फोट होऊनही तीन सिलिंडर कसे फुटले नाहीत, हे मोठे कोडे आहे, असे ते म्हणाले. अग्निशमन सेवा दलाचे संचालक नितीन रायकर म्हणाले की काही वर्षांपूर्वी मडगाव येथेही अशीच आग लागली होती. दोन्ही घटनांमध्ये बरेच साम्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.
हा घातपाताचा प्रकार असावा : प्रमिला मयेकर
रात्री दीड वाजण्याच्या दरम्यान आम्ही बार बंद केले होते, अशी माहिती बारच्या मालक प्रमिला मयेकर यांनी दिली. स्फोट कसा झाला हे आम्हाला कळाले नाही. आतील सर्व सामान जळून खाक झाले आहे. आमचे नुकसान व्हावे, म्हणून कुणीतरी हा घातपात घडवून आणला असावा. पोलिसांनी याबाबत निष्पक्ष चौकशी करावी, असेही त्या म्हणाल्या. मात्र मयेकर यांच्या म्हणण्याप्रमाणे बार दीड वाजता बंद केले तर पोलीस अधीक्षक जिवबा दळवी यांनी सांगितले की सीसी टिव्ही फुटेजवरुन बार साडेतीन वाजता बंद केल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघांच्याही वेळेमध्ये विरोधाभास असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी एका स्वयंपाक गॅस सिलिंडरचा रेग्युलेटर बंद करण्यात यश मिळविले आणि बाकीचे सिलिंडर बाहेर काढले, त्यामुळे आणखी मोठा अनर्थ टळला. म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्रांव यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश कान्नाईक, देवेंद्र नाईक, हितेश परब, संजीव कोरगावकर, प्रवीण गावकर, भगवान पाळणी यांनी ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळवून सुमारे 50 लाखांची मालमत्ता खाक होण्यापासून वाचविली.
या घटनेची माहिती मिळाल्यावर म्हापशाचे आमदार तथा उपसभापती जोशुआ डिसोझा, प्रभारी नगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर, नगरसेवक तारक आरोलकर, नगरसेविका डॉ. नूतन डिचोलकर, अॅड शषांक नार्वेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी सूचन आमदार डिसोझा यांनी अधिकाऱ्यांनी केली.









