वाहनांची संख्या वाढल्याने विमानतळापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव : वाहतूक कोंडीमुळे समस्या

प्रतिनिधी /बेळगाव
शहरासह सांबरा रोडवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे सांबरा रोडचे रुंदीकरण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग गांधीनगर पासून 700 मिटर अंतराच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि त्यापुढे सांबरा पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. हे काम सुरू झाले असून, सध्या या रस्त्यावर वाहतूक केंडी होत आहे.
सांबरा रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. तसेच सांबरा विमानतळावर ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली असल्याने रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याने तयार केला आहे. सध्या हा रस्त्या काही ठिकाणी 4 पदरी तर काही ठिकाणी दुपदरी आहे. सांबरा विमानतळापर्यंत ऊंदीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या गांधीनगर राष्ट्रीय महामार्गापासून रस्त्याच्या रुंदीकरणास प्रारंभ करण्यात आले आहे. या भागात विविध व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे पार्किंग करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. त्याकरिता 700 मिटरच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. तसेच या रस्त्याची रूंदी 50 फूट करण्यात येत आहे.
त्यानंतर फुटपाथ व गटारीचे बांधकाम करण्यात येणार आहे. 700 मिटर पुढील रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण केले जाणार आहे. तसेच दुभाजक आणि फुटपाथ आदी सुविधा उपलब्ध केल्या जाणारm आहेत.
गांधीनगर येथे काँक्रिटीकरण सुरू
गांधीनगरपासून एका बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू केले आहे. याकरिता रस्त्याच्या बाजूला खोदाई करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक एका बाजूने सुरू आहे. हा रस्ता खूपच वर्दळीचा असल्याने अवजड वाहनांसह सर्व वाहनांची कोंडी होत आहे. या परिसरात रस्त्याच्या शेजारी अवजड वाहने पार्क केली जातात. त्यामुळे अन्य वाहनांना ये-जा करण्यास रस्ता मिळत नाही. परिणामी वाहतूक कोंडी होत आहे. रस्ता ऊंदीकरण करण्यात येत असल्याने संरक्षक पट्ट्या लावल्या आहेत. पण वाहनांची कोंडी होवू नये याकरिता खबरदारी घेण्यात आली नाही. ऊंदीकरण सुरू असलेल्या ठिकाणी वाहने पार्क करण्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. त्याकरिता या परिसरात रहदारी पोलिसांची नियुक्ती करणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
वाहतूक कोंडी झाल्याने वाहनधारकांना अडकून पडावे लागत आहे. समस्या निवारणासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी होत आहे.









