7 फेब्रुवारीला ममता बॅनर्जी यांचा रोड शो
वृत्तसंस्था / अगरतळा
त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 2 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे. पश्चिम बंगालमधील सत्तारुढ पक्ष तृणमूल काँग्रेस देखील त्रिपुराची निवडणूक लढविणार आहे. राज्यातील सर्व 60 मतदारसंघांमध्ये स्वतःचे उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा तृणमूलने केली आहे.
आमचा पक्ष ‘एकला चलो’च्या धोरणावर विश्वास ठेवणारा आहे. पश्चिम बंगालप्रमाणेच त्रिपुरामध्येही आम्ही स्वबळावर निवडणूक लढविणार आहोत असे उद्गार तृणमूल प्रदेशाध्यक्ष पीयूष कांति बिस्वास यांनी काढले आहेत. तृणमूलचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीत प्रत्येक मतदारसंघासंबंधी चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी सामील झाले होते. पक्षाने त्रिपुरामधील सर्व 60 मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. प्रत्येक मतदारसंघासाठी दोन इच्छुक उमेदवारांची नावे तयार ठेवण्यात आली असून विजयाची अधिक संधी असलेल्या एका उमेदवाराला तिकीट देण्यात येणार असल्याचे तृणमूल काँग्रेसचे नेते राजीव बॅनर्जी यांनी सांगितले आहे.
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी त्रिपुरात अनेक प्रचारसभा घेणार आहेत. निवडणूक प्रचाराची पूर्ण रुपरेषा तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 7 फेब्रुवारी रोजी त्रिपुरामध्ये रोड शो करणार आहेत. त्यापूर्वी ममतादीदी त्रिपुरेश्वरी मंदिरात पूजा करणार आहेत अशी माहिती राजीव बॅनर्जी यांनी दिली.
त्रिपुरामध्ये भाजपने काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्रिपदावरून विप्लव कुमार देव यांना हटवून माणिक साहा यांच्या हातात सत्तेची सूत्रे दिली आहेत. मागील 5 दशकांपासून परस्परांचे विरोधक राहिलेल्या काँग्रेस आणि माकपने निवडणुकीकरता आघाडी केली आहे. तृणमूल काँगेससह त्रिपुरा राजघराण्याचे सदस्य प्रद्योत विक्रम माणिक्य देव वर्मन यांचा पक्ष टिपोरा मोथा निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने चुरस वाढली आहे.
त्रिपुरातील मागील निवडणुकीत भाजपने 60 पैकी 36 जागा जिंकल्या होत्या. तर माकपला 16 आणि आयपीएफटीला 8 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब राहिली होती. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. मागील निवडणुकीत त्रिपुरामध्ये भाजपला 44 टक्के मते मिळाली होती. तर माकपच्या नेतृत्वाखालील आघाडीलाही 44 टक्के मते प्राप्त झाली होती. आयपीएफटीला 7 टक्के तर इतरांना 5 टक्के मते मिळाली होती.









