अध्याय पंचविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, ब्रह्म हे एकटेएकच आहे. प्रकृती व पुरुष यांची स्वरूपे काळरूपाने वेगळी भासतात. ती अखंडत्वाने पाहिली की, मी श्रीकृष्ण परमात्माच सर्वव्यापी आहे हे लक्षात येते. उत्पत्तीच्या पूर्वी असणारे पूर्ण ब्रह्म म्हणजे मी, उत्पत्तीचे आदिकारण ब्रह्म ते मीच आणि स्थितीकाळी ब्रह्मरूपाने असणारा मीच, अशी मी स्वतः एकातच अनंत रूपं दाखवितो. आपल्याच लीलेने सृष्टीच्या अखेरीस प्रलय झाल्यानंतर मी परिपूर्ण ब्रह्मस्वरूपच शिल्लक उरतो. कल्पाच्या सुरवातीला मी एकटाच असतो. कल्पाच्या कालावधीत विभूतीरुपाने वावरतो आणि कल्पाच्या शेवटी माझे एकटय़ाचेच अस्तित्व उरते. मी गीतेत सांगितल्याप्रमाणे भूतांचे मूळ अव्यक्ती । मध्य तो व्यक्त भासतो । पुन्हा शेवट अव्यक्ती। त्यामधे शोक कायसा । 2 . 28। हेच खरे आहे. म्हणून मी अर्जुनाला म्हणालो की, युद्धात मरणाऱया आप्त स्वकीयांच्या मरणाचा शोक करू नकोस कारण तू त्यांना मारणार हा केवळ देखावा आहे. यांचा मृत्यू कधी होणार हे मी आधीच ठरवले आहे तू फक्त त्यांची अंमलबजावणी करणारा आहेस हे लक्षात घे. जोपर्यंत परमात्म्याची ईक्षणशक्ती आपले काम करीत राहते, तोपर्यंत जीवांच्या कर्मभोगासाठी कारणकार्यरूपाने हे विविध सृष्टिचक्र अखंड चालू राहते. बाप आणि पुत्र, अशा परंपरेने संसार हा महान म्हणजे अत्यंत मोठा झालेला आहे. हा अगदी अखंड, निरंतर असणारा आणि अत्यंत दुर्धर असा वाढलेला आहे. हा संसार अतिशय दुर्धर असा कशाने वाढला? या प्रश्नाचे उत्तर भगवंत पुढे सांगत आहेत. ते म्हणाले, माणसाला विषयांची खूप आवड असते. त्यामुळे त्यात त्याला फार स्वारस्य असते. विषयांच्या आसक्तीने माणसाचा स्वभाव विषयांच्या उपभोगासाठी तळमळू लागतो. ते उपभोग मिळवण्यासाठी स्वतःला कर्ता समजून धडपडू लागतो आणि त्या नादात अत्यंत प्रेमाने संसाराचे स्वरूप वाढवत राहतो. खवळलेला देहाभिमान. परब्रह्मरुपी आत्म्याला जीवपणा लावतो त्यातूनच चालू जन्मातील अपुऱया राहिलेल्या वासना पूर्ण होण्यास अनुकूल अशा योनीत पुनर्जन्म होतो. अशा प्रकारे निरनिराळय़ा योनीत जन्ममरण वाढत जाते. ब्रह्मदेवाने अत्यंत दुर्धर असा संसार उत्पन्न केला आहे आणि तो ब्रह्मदेवाचे आयुष्य असेपर्यंत असाच कायम राहणार आहे आणि ब्रह्मप्रळय होईल तेव्हा सृष्टीचा संहार होणार आहे. प्रलयाचे नित्य, दैनंदिन, कर्मजन्य आणि अवांतर असे चार प्रकार आहेत पण या सर्व प्रलयांहून श्रे÷ अशी ब्रह्मप्रळयाची थोरवी आहे. कारण तो सर्व सृष्टीचा संहार करतो व संसारात काहीच शिल्लक उरू देत नाही. ब्रह्मप्रळयात सृष्टीचा नाश करावयाचा आणि नंतर नव्या कल्पाच्या आरंभी सृष्टि रचण्याकरिता उंच-नीच अशा नानाप्रकारच्या योनींना नवीन तयार करावयाचे, ह्याला कारण काय असे विचारशील तर त्याचे उत्तर असे देता येईल की, ब्रह्मप्रळयातही सृष्टीचा लय होतो खरा, पण निखालस नाश होत नाही. तर वासनारूप बीजविभाग शिल्लक उरतो आणि तो अविद्येच्या अंगामध्ये पूर्णपणे लीन होऊन राहतो. त्याच वासनारूप बीजाने नव्या कल्पाचा आरंभ होतो. ज्याप्रमाणे पावसाळय़ात नानाप्रकारची गवते वाढून ती शरद ऋतूत पूर्ण दशेला येतात आणि त्याचीच बीजकणे उन्हाळय़ात मातीत मिळून जातात. अशी बीजे पृथ्वीवर सर्वत्र पसरलेली असतात पण ती कुणालाच उघडपणे दिसत नाहीत, त्याप्रमाणे प्रलयाच्या शेवटी वासनाबीजरूपाने संसार अव्यक्तामध्ये शिल्लक राहतो. ज्याप्रमाणे ती उन्हाळय़ात जमिनीवर पडलेली बीजे वर्षाकाळात पाऊस पडला म्हणजे जोराने उगवतात आणि नाना प्रकारची गवते पूर्वीप्रमाणे अगदी हुबेहूब वाढत असतात. म्हणून ब्रह्मदेवाच्या प्रलयातसुद्धा सृष्टीचा पूर्णपणे नाश होत नाही. हे लक्षात घेऊनच संसार अनंत आहे असे वेदशास्त्रात प्रतिपादन केले आहे पण अशा प्रकारे संसार अनंत असूनही ह्याचा निःशेष नाश ज्याला आत्मज्ञान झाले आहे, त्याच्या दृष्टीने होऊ शकतो, असे भगवंतांचे म्हणणे आहे.
क्रमशः








