अनार पटेल यांची नव्या विश्वस्त म्हणून नियुक्ती
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातमध्ये पाटीदारांमधील लेउवा पटेल यांची शक्तिशाली संघटना खोडलधाम ट्रस्टमध्ये माजी मुख्यमंत्री आणि उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची कन्या अनारची एंट्री झाली आहे. आतापर्यंत स्वयंसेवी संस्थांमध्ये कार्यरत अनार पटेल यांचे राजकारणापूर्वी सामाजिक क्षेत्रात पाऊल पडल्याचे मानले जात आहे. गुजरातच्या वडोदरा येथील मांजलपूर मतदारसंघात त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती, परंतु त्यांनी निवडणूक लढविली नव्हती. विधानसभा निवडणुकीनंतर खोडलधाम ट्रस्टमध्ये अनार पटेल यांच्या एंट्रीला राजकारणापूर्वीचे मोठे पाऊल म्हणून मानले जात आहे.
खोडलधाम ट्रस्ट राजकोट जिल्हय़ातील खोडलधाम मंदिराचे व्यवस्थापन सांभाळतो. याचबरोबर हा ट्रस्ट सामाजिक सेवा क्षेत्रात सक्रीय आहे. खोडलधाम ट्रस्टचे प्रमुख नरेश पटेल यांनी 41 नव्या विश्वस्तांना नियुक्त केले आहे. यात अनार पटेल यांचे नाव सामील आहे. या ट्रस्टच्या स्थापनेत आनंदीबेन पटेल यांचे सहकार्य मिळाले होते असे नरेश पटेल यांनी म्हटले आहे.









