पूर्वीपेक्षा अधिक आनंदी असल्याचे महिलेचे विधान
श्वानाला सर्वात ईमानदार प्राणी मानले जाते. लोक स्वतःच्या घराची सुरक्षा आणि आवड म्हणून श्वान पाळत असतात. अनेकदा श्वानाच्या ईमानदारीच्या घटना कानावर येत असतात. परंतु श्वान सर्वात चांगला पती ठरू शकतो असे तुम्हाला कुणी सांगितले तर काय वाटेल? एका महिलेने श्वानासाठी स्वतःच्या पतीला घटस्फोट दिला आहे.
एका महिलेने पतीला घटस्फोट दतेत श्वानाशी विवाह केला आहे. श्वानासाठी पतीला घटस्फोट देणाऱया महिलेचे नाव अमांडा रोजर्स असून ती सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. 49 वर्षीय अमांडा ही यापूर्वी क्रोएशियात वास्तव्यास होती. अमांडाने 2014 मध्ये पतीला घटस्फोट देत श्वानाशी विवाह केला होता. काही काळापूर्वी तिने मुलाखत दिल्यावर तिची सर्वत्र चर्चा होत आहे.

अमांडा रोजर्सने श्वानासोबत लपून-छपून विवाह केलेला नाही, उलट तिने स्वतःच्या विवाहसोहळय़ाकरता 200 जणांना निमंत्रित केले होते. अमांडाने श्वानासोबत अत्यंत धुमधडाक्यात विवाह केला होता. विवाहाकरता तिने मोठा खर्चही केला होता. सर्वात खास बाब म्हणजे विवाहात सर्व प्रथा-परंपरांचे पालन करण्यात आले. या विवाहात केवळ वराच्या जागी एक श्वान होता.
अमांडा रोजर्सच्या श्वानाचे नाव शेबा असून तो दोन महिन्यांचा असताना ती त्याच्यावर प्रेम करू लागली होती. पतीसोबत असताना मी कधीच आनंदी नव्हते. शेबासोबत मात्र अत्यंत आनंदात राहत आहे. पती जे प्रेम देऊ शकला नाही, त्याची पूर्तता श्वान करत आहे. मी माझ्या श्वानाची मोठी काळजी घेते आणि नेहमी त्याला चांगले अन्न देत असल्याचे अमांडाचे सांगणे आहे.
शेबा देखील मला प्रेम करतो, आम्हा दोघांमध्ये मागील जन्मापासून नाते असावे. आम्ही दोघेही परस्परांसोबत अत्यंत आनंदी आहोत असे अमांडा सांगते. परंतु सोशल मीडियावर लोकांनी तिच्या या विवाहाची चेष्टा देखील केली आहे. तर काही लोकांनी अमांडाचे समर्थनही केले आहे.









