कसबा बीड/ प्रतिनिधी
सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथे कुंभी कासारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला सत्ताधारी नरकेविरोधी गट एकत्रितरित्या निवडणुक लढवण्याचा सुर उमटला.
या बैठकीत कुंभी कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने कारखाना मोठ्या संकटात सापडला आहे. कारखाना खाजगी कंपनीच्या हातात जातो की काय ? अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कारखाना वाचविण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी कारखाना निवडणुकीत सत्तारूढ नरकेविरोधी सर्व गट एकत्र आले असून सर्व जण ताकदीने उतरणार आहोत. नरकेविरोधी गटांची एकजूट होऊन परिवर्तनाची गरज असल्याचे गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी सांगितले. सत्तारूढ नरकेविरोधी गटाच्या कार्यकर्त्यांच्या, सभासदांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील होते. यावेळी तुळशी खोऱ्यातील हिरवडे दुमाला, सडोली दुमाला, मांडरे, चाफोडी आदी गावातही आढावा बैठकीत घेण्यात आल्या.
यावेळी खाडे यांनी कुंभी कारखान्यात कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन घडवून आणायचेच या विचाराने राजर्षी शाहू आघाडी, कुंभी बचाव मंच, यशवंत मंच व समविचारी गट सर्व जण एकत्र आलो आहोत असे सांगून परिवर्तनासाठी साथ द्या, असे आवाहनही केले. पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कारखाना डबघाईला आणला आहे. कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वजण एकजुटीची शपथ घेऊन निवडणूक लढवणार असल्य़ाचे सांगितले.
यावेळी माजी अध्यक्ष संभाजी पाटील, माजी सभापती पांडुरंग पाटील, सर्जेराव भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत सरपंच भगवान रोटे यांनी केले. भगवान पाडळकर, एकनाथ पाटील, बुद्धीराज पाटील, एस.के.पाटील, सर्जेराव पाटील, सरदार पाटील, बळवंत कारंडे, गावातील समर्थक कार्यकर्ते, सभासद उपस्थित होते. आभार उपसरपंच प्रकाश कदम यांनी मानले.