प्रतिनिधी/ मडगाव
रायपूर -छत्तीसगड येथील सुनितकुमार कश्यप याला दारु पिऊन वाहन चालवल्याच्या आरोपावरुन म्हापसा न्यायालयाने 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आणि दंडाची ही रक्कम न भरल्यास एक महिना कैदेची शिक्षा भोगावी असा आदेश दिला.
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार आरोपी सुनित कुमार हा 20 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमाराला कळंगूट येथील बागा सर्कल येथे जीए-03-डब्ल्यू-9484 क्रमांकाच्या दुचाकीवरुन जात असताना या आरोपीने हेल्मेट परिधान केले नव्हते. शिवाय दारुच्या नशेत आरोपी वाहन चालवत होता. या कारणास्तव या आरोपविरुद्ध वाहतूक पोलिसांनी मोटर वाहन कायद्याच्या 94-डी आणि 185 कलमाखाली गुन्हा नोंद केला होता.
आरोपीला न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने आरोपीला त्याच्यावर असलेला आरोप सांगितला तेव्हा आरोपीने गुन्हा मान्य केला. आरोपीला न्यायालयाने मोटर वाहन कायदा 94-डी नुसार 1000 रुपये भरण्याचा दंड ठोठावला. शिवाय 185 कलमाखाली आरोपीने 10,000 रुपयाचा दंड भरावा किंवा एक महिना कैदेची शिक्षा भोगावी असा आदेश दिला.
आरोपीने दंड भरल्यास ही रक्कम न्यायालयाच्या नाझिर विभागात जमा करण्यात यावी असाही न्यायालयाने आदेश दिला.









