न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांनी मराठीतून अनुभव सांगितला
प्रतिनिधी/ बेळगाव
आमच्या आजोबांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. ते आमचे नातेवाईकच. त्यामुळे त्यांचा प्रभाव आमच्या संपूर्ण कुटुंबावर पडला. आमच्या घरातील सारेच शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाले. त्यातूनच मलादेखील प्रेरणा मिळून मी आज न्यायाधीश झालो. मी मूळचा निपाणीचा. त्यामुळे बेळगावमध्ये मी आल्यानंतर माझ्या लहापणीच्या आठवणी जाग्या झाल्या, असे म्हणत न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांनी आपले बालपण उलगडले.
बेळगावमध्ये तसेच रामदुर्ग येथील न्यायालयाच्या आवारात बांधण्यात आलेल्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच खानापूर येथे न्यायालयीन क्वॉर्टर्सच्या उद्घाटनासाठी ते बेळगावात आले होते. बेळगावमधील न्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी मराठीतूनच त्यांनी आपल्या लहानपणीचे काही निवडक किस्सेही सांगितले. पूर्वी सिनेमा बघणे म्हणजे एक वेगळा गुन्हा केल्यासारखेच होते. एखादा सिनेमा बघणेदेखील अवघड होते. मला काकांनी आणि बहिणीने बेळगावला सिनेमा बघण्यास पाठविले होते. त्यावेळी मी धरमवीर हा चित्रपट पाहिलो असल्याचे त्यांनी सांगितले.
मी मुंबईमध्ये न्यायाधीश म्हणून काम पाहिले. त्यानंतर कर्नाटकच्या उच्च न्यायाधीशपदी माझी नियुक्ती झाली. हे केवळ आमच्या घरातील संस्कारांमुळे झाले, असे सांगितले. बेळगावच्या कुंद्याची चव अजूनही मला आठवते. बेळगाव म्हणजे हे आपले माहेर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इंग्रजी, कन्नडबरोबर मराठीतून त्यांनी आपले विचार व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेमुळे आज न्यायालयीन प्रक्रियेत मी आलो आहे. याचा मला अभिमान आहे, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
बेळगावमध्ये आल्यानंतर मी माझे मूळ गाव निपाणी येथे राहण्यासाठी गेलो. बऱ्याच वर्षांनंतर मी घरी गेलो. त्यामुळे मला मोठा आनंद झाला. माझी सरकारी विश्रामधामवर सर्व सोय करण्यात आली होती. मात्र, त्यापेक्षाही आपल्या घराकडील अनुभव घ्यायचा होता. त्यासाठीच मी निपाणीला एक दिवस राहिलो, असे सांगून त्यांनी बेळगावबद्दल आपला आदर व्यक्त केला.









