भारतीय वंशाच्या नेत्या ः बिडेन विरोधात निवडणूक लढविण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेतील भारतीय वंशाच्या रिपब्लिकन नेत्या निक्की हेली यांनी पुढील अध्यक्षीय निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. देशाला मी नवी दिशा देऊ शकते आणि अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून जो बिडेन यांना दुसरा कार्यकाळ मिळणे शक्य नसल्याचे हेली यांनी म्हटले आहे. साउथ कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर हेली यांनी अध्यक्षीय पदाची निवडणूक लढविण्याची योजना तयार करत असल्याचे एका मुलाखतीत सांगितले आहे.
अमेरिकेचे नेतृत्व मी करू शकते. अध्यक्षीय पदाच्या शर्यतीत दोन गोष्टी पाहिल्या जातात. वर्तमान स्थिती नव्या नेतृत्वाला संकेत देत आहे का? आणि आम्हाला नवी दिशा देण्याची गरज आहे का या प्रश्नांची उत्तरे याकरता महत्त्वाची आहेत. अमेरिकेचे नेतृत्व मी करू शकते असे हेली यांनी म्हटले आहे.
गव्हर्नर आणि राजदूत म्हणून मी अत्यंत चांगले काम केले आहे. रिपब्लिकन पार्टीत नवे नेतृत्व आणण्याची ही वेळ आहे. डेमोक्रेट अध्यक्ष बिडेन यांना दुसरा कार्यकाळ दिला जाऊ नये असे हेली यांनी मुलाखतीत सांगितले आहे. निक्की हेली या बॉबी जिंदल यांच्यानंतर अमेरिकेत गव्हर्नर होणाऱया दुसऱया भारतीय वंशीय ठरल्या होत्या. अमेरिकेत पुढील अध्यक्षीय निवडणूक 5 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे.
व्हाइट हाउसमध्ये एका 80 वर्षीय अध्यक्षाची गरज नसल्याचे हेली यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा रोख माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दिशेने होता. 2024 मध्ये ट्रम्प हे 78 वर्षे तर जो बिडेन हे 82 वर्षांचे होणार आहेत.









