ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होईल, असे मला वाटत नाही. या दोन्ही जागा लढविण्यासाठी आमचे कार्यकर्ते इच्छूक आहेत. येत्या दोन दिवसात महाविकास आघाडी एकत्रित बसून यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.
भाजप आ. मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसबा विधानसभा तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने चिंचवड विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. कसबा मतदारसंघातून भाजपची काही नावे समोर येत आहेत. दिवंगत मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळकही या जागेसाठी इच्छूक आहेत. तर चिंचवडमध्ये भाजपकडून शंकर जगताप अथवा दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचं नाव समोर येत आहे. पण भाजपच्या गोष्टींमध्ये नाक खुपसण्याची आपल्याला गरज नाही.
कसबा आणि चिंचवडची जागा लढविण्याची इच्छा अनेकांनी मला बोलून दाखवली आहे. सोमवार-मंगळवारी महाविकास आघाडी एकत्रितपणे यावर चर्चा करणार आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल, याबाबत मला शंका आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून नाना काटे, भाऊसाहेब भोईर हे चिंचवडमधून पोटनिवडणूक लढविण्यास तयार आहेत. शिवसेनेचे राहुल कलाटे 2019 ला बंडखोरी करत लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात काही हजारांच्या मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे उमेदवारांच्या नावामध्ये त्यांचीही चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.








