जमीन हडप प्रकरणी आयुक्तांकडून प्लॉटची पाहणी
प्रतिनिधी /म्हापसा
उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांची गोव्यातील बेकायदा जमीन बळकावण्याच्या घटनांच्या चौकशीसाठी एक सदस्यीय आयोगाचे आयुक्त म्हणून राज्य सरकारकडून नियुक्ती केली आहे. त्यांनी आज गुऊवारी आसगाव-बादे, हणजूण तसेच कळंगूटमध्ये भेट देत एकूण नऊ प्लॉटची पाहणी केली. यावेळी एसआयटीचे पदाधिकारी आयुक्तांसोबत होते.
बार्देश तालुक्यात जवळपास 51 जागा कथितपणे बळकावल्याचा आरोप आहे. तर एसआयटीने आतापर्यंत 44 गुन्हे नोंदविले आहेत. तर 26 जणांना आतापर्यंत अटक झाली आहे. राज्यातील एकंदरीत या जमीन हडप प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
यावेळी पोलिस अधीक्षक निधिन वॉल्सन, उपअधीक्षक संतोष देसाई, एसआयटी पोलीस निरीक्षक सुरज सामंत तसेच एसआयटीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. आयुक्त जाधव यांनी सुऊवातीला बादे आसगाव येथे चार जागांना भेट देत पाहणी केली. आणि दुपारनंतर हमजूण व कळंगूट परिसरास भेट दिली.
जमीन हडप्रकरणी एसआयटीमार्फत सुरू असलेल्या प्रकरणातील मास्टरमाइंड महम्मद सुहेल याला आणखी एका कळंगूट येथील प्रकरणात सातव्यांदा अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तो अनेक प्रकरणांमध्ये असल्याने एका प्रकरणातून जामीन मिळाल्यावर त्याला दुसऱ्या प्रकरणामध्ये अटक करण्याचे सत्र सुरूच आहे. काल त्याला सहाव्या गुह्यात जामीन मिळाल्यानंतर लगेच त्याला सातव्या प्रकरणात एसआयटी पथकाने अटक केली होती. त्याच्या विऊद्ध आतापर्यंत एसआयटीने केलेल्या चौकशीत सुमारे 20 पेक्षा अधिक प्रकरणामध्ये त्याचा समावेश आहे.









