कृष्णाजी कुलकर्णी : बॅ. नाथ पै व्याख्यानमालेची सांगता
प्रतिनिधी /बेळगाव
संत ज्ञानेश्वरांनी केलेल्या क्रांतीमुळे अठरा पगड जातीच्या लोकांना विठ्ठलाच्या पायावर माथा टेकविता येतो. ही एक धार्मिक त्याचसोबत सामाजिक उत्क्रांती आहे. संतांनी संस्कृती वाढविण्यासह तिचे संवर्धन केले. मराठी भाषा शेकडो वर्षानंतरही टिकली ती संतांमुळेच. संतांनी सत्याचा मार्ग सांगितला असला तरी त्यांनी सांगितलेली सामाजिक समानता दृष्टीआड करून चालणार नाही, असे प्रतिपादन गोवा येथील व्याख्याते कृष्णाजी कुलकर्णी यांनी केले.
सार्वजनिक वाचनालायातर्फे आयोजित बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प शुक्रवारी कृष्णाजी कुलकर्णी यांनी गुंफले. ‘संत शिकवण आणि आजचा समाज’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन करत अनेक संतांचे संदर्भ दिले. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद राऊत उपस्थित होते.
नामदेवांमुळे संत साहित्य देशभर
ज्ञानेश्वरांचाच वारसा पुढे चालवत नामदेवांनी संत साहित्याचा प्रचार व प्रसार केला. नामदेवांनी पंजाबपर्यंत संत साहित्य पोहोचविले. त्यामुळेच पंजाबमध्ये नामदेवांची शेकडो मंदिरे दिसून येतात. संतांनी केलेल्या संस्कारामुळे आजही वारीची परंपरा सुरू आहे. वारीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता आला नसला तरी जो वारकरी वारी करून आला त्याला नतमस्तक होणे हा संस्कार आजही पाळला जातो, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
प्रारंभी प्रा. विनोद गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष गोविंद राऊत यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.









