खबरदारी म्हणून शेळ्या-मेंढ्यांचे लसीकरण
प्रतिनिधी /बेळगाव
पीपीआर रोगाला आळा घालण्यासाठी पुढील महिन्यापासून ‘पीपीआर’ प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व शेळ्या-मेंढ्यांना ही लस टोचली जाणार आहे. संबंधितांनी शेळ्या-मेंढ्यांना लस टोचून घ्यावी, असे आवाहन पशुसंगोपनने केले आहे.
चाऱ्यातून शेळ्या-मेंढ्यांना विविध आजारांची लागण होते. दरम्यान खबरदारी म्हणून खात्याने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. लम्पी विषाणूजन्य रोगामुळे जिल्ह्यातील हजारो जनावरे दगावली आहेत. त्यामुळे खात्याने दक्षता म्हणून जिल्ह्यातील सर्व शेळ्या-मेंढ्यांसाठी पीपीआर लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात 28 लाख जनावरे आहेत. त्यामध्ये 9 लाख शेळ्या-मेंढ्या आहेत. विशेषत: धनगर बांधवांकडे शेळ्या-मेंढ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान चाऱ्यातून शेळ्या-मेंढ्यांना साथीच्या आजाराची लागण होते. अशा रोगापासून बचाव करण्यासाठी ही मोहीम राबविली जाणार आहे.
वेगवेगळ्या ऋतुंमध्ये शेळ्या-मेंढ्यांना व त्यांच्या पिलांना रोगाची लागण होत असते. दरम्यान लहान पिले मरतुकीचे प्रमाण अधिक असते. हे रोखण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण आवश्यक आहे. दरम्यान खात्याने यंदा पीपीआर लसीकरण मोहीम अधिक तीव्रपणे राबविली जाणार असल्याचे सांगितले आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे लसीकरण मोहीम थांबली होती. मात्र यंदा पूर्ववतपणे लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. विशेषत: ग्रामीण भागातील शेतकरी व माळरानावर फिरणाऱ्या धनगरांच्या शेळ्या-मेंढ्यांना लस दिली जाणार आहे.
पशुपालकांनी लाभ घ्यावा
पुढील महिन्यात सर्व शेळ्या-मेंढ्यांसाठी पीपीआर प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. सर्व शेळ्या-मेंढ्या पालकांनी याचा लाभ घ्यावा. लम्पीच्या प्रादुर्भावामुळे पशुपालक धास्तावले आहेत. मात्र खबरदारी म्हणून न चुकता शेळ्या-मेंढ्यांना लस टोचून घेऊन सहकार्य करावे.
– डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक पशुसंगोपन खाते)









