सोमवारी लेखी युक्तिवाद देण्याचा आदेश ः 30 जानेवारीला निर्णय शक्य, शिंदे गट राजकीय पक्ष नसल्याचा ठाकरे गटाचा दावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोणाची शिवसेना खरी, या महाराष्ट्रातील वादाचे उत्तर शुक्रवारच्या सुनावणीनंतरही अस्पष्टच राहिले आहे. शुक्रवारी निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी साधारणतः अडीच तास युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडूनही त्याला दीड तास प्रत्युत्तर देण्यात आले. आता येत्या सोमवारी म्हणजे 23 जानेवारीला दोन्ही पक्षांनी लेखी युक्तिवाद सादर करावेत असा आदेश आयोगाने दिला. तसेच पुढील सुनावणी 30 जानेवारीला होईल, असेही स्पष्ट केले. त्यामुळे पेचप्रसंग लांबणार हे स्पष्ट झाले.
23 जानेवारीला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कालावधी संपत आहे. त्यामुळे हा कालावधी वाढवून द्यावा, किंवा पक्षाच्या प्रतिनिधी सभेची निवडणूक घ्यावी, अशा मागण्या ठाकरे गटाकडून आयोगासमोर मांडण्यात आल्या. या मागण्यांवर अद्याप आयोगाने निर्णय दिलेला नाही.
ठाकरे गटाचा युक्तिवाद
ठाकरे गटाचे वकील सिब्बल यांनी शिवसेनेची घटना आयोगासमोर सादर केली. खरा शिवसेना पक्ष या घटनेनुसार ठाकरे गटच आहे. या घटनेनुसार शिंदे गट हा राजकीय पक्षच नाही. शिंदे गटाने केलेली प्रत्येक कृती बेकायदेशीर आणि घटनाबाहय़ आहे. शिंदे गटाला प्रतिनिधी सभा निवडण्याचा अधिकार नाही. शिंदे गटाने प्रतिनिधी सभेची बैठकही घेतलेली नाही. त्यामुळे हा गट राजकीय पक्षच ठरत नाही. परिणामी, तो खरी शिवसेना असल्याचा दावा करु शकत नाही. पक्ष चालविण्याचा अधिकार प्रतिनिधी सभेलाच असतो आणि ही सभा उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. शिवसेनेच्या घटनेनुसार प्रतिनिधीसभा कोणालाही रद्द करता येत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा गटच खरी शिवसेना ठरतो. तर शिंदे गट बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. शिवसेनेची घटना कायदेशीर नाही, असा युक्तिवाद शिंदे गटाकडून केला गेला आहे. पण जी घटना त्यांना मान्य नाही तर त्यांनी पक्षनेतेपद कसे घेतले, असा प्रश्न त्यांनी केला.
शिंदे गटाला अधिकार नाही
शिंदे गटाला राजकीय पक्ष म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे आणखी एक वकील देवदत्त कामत यांनीही केला. शिवसेनेच्या घटनेनुसार केवळ आमदार आणि खासदार म्हणजे पक्ष नाही. तर पक्षाची प्रतिनिधी सभा, पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते इत्यादी घटकच महत्वाचे असतात. हे घटक पक्षाचे अस्तित्व ठरवितात. हे घटक ठाकरे यांच्याकडेच आहेत. त्यामुळे ठाकरे गटच खरी शिवसेना आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.
शिंदे गटाचे प्रत्युत्तर
शिंदे गट ही शिवसेनेत पडलेली उभी फूट आहे. हा गट हा राजकीय पक्षच आहे आणि तीच खरी शिवसेना आहे. शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षप्रमुख हे पदच नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या पदावरुन घेतलेले सर्व निर्णय घटनाबाहय़ आणि अवैध ठरतात. शिंदे गटाकडून सादर करण्यात आलेली सर्व कागदपत्रे वैध आहेत. या गटाने प्रत्येक कृती घटनेनुसार केली आहे. त्यामुळे हाच गट खरा शिवसेना पक्ष आहे, असा युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी केला. मणिंदर सिंग या वकिलांनीही शिंदे गटाच्या वतीने प्रत्युत्तर युक्तिवाद केला.
शाब्दिक चकमक
ठाकरे गटाच्या वतीने देवदत्त कामत युक्तिवाद करत असताना त्यांची शिंदे गटाचे विधीज्ञ महेश जेठमलानी यांच्याशी जोरदार शाब्दिक चकमक उडाली. कामत यांनी याचिकेत जे मुद्दे मांडण्यात आले आहे, त्यांना धरुनच युक्तिवाद करावा, अशी सूचना जेठमलानी यांनी केली. मात्र, मी मला योग्य वाटेल तेच बोलणार, आपण हस्तक्षेप करु नका, असे प्रत्युत्तर कामत यांनी दिले. त्यामुळे वाद पेटला. अखेरीस निवडणूक आयोगालाच मध्यस्थी करुन दोघांनाही शांत करावे लागले.
आता पुढे काय ?
शिवसेना पक्षप्रमुखपदाचा कालावधी 23 जानेवारीला संपत आहे. त्याआधी जर पक्षप्रमुखाची नियुक्ती झाली नाही, तर ते पद रिक्त होण्याची शक्यता आहे. पण निवडणूक आयोगाने यासंबंधी शुक्रवारी कोणताही निर्णय दिला नाही. दोन्ही पक्षांना सोमवारपर्यंत लेखी युक्तिवाद सादर करण्याचा आदेश दिला. निवडणूक आयोगाने जर 23 जानेवारीच्या आधी निर्णय दिला नाही, तर उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचे काय होणार हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आयोग यासंबंधी येत्या सोमवारी, अर्थात 23 जानेवारीला काही निर्णय देणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. पुढील सुनावणी आता 30 जानेवारीला आहे.
जोरदार युक्तिवाद
ड शुक्रवारी दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद, प्रतियुक्तिवाद
ड शिंदे गट हा राजकीय पक्षच नसल्याचा ठाकरे गटाचा दावा
ड पक्षप्रमुख पदाचा कालावधी वाढवून देण्याची केली मागणी
ड पक्षप्रमुख पद हे शिवसेनेच्या घटनेतच नसल्याचा पुनरुच्चार
ड शिंदे गटाकडून सादर सर्व कागपदत्रे योग्य ः गटाचे म्हणणे
ड सोमवारपर्यंत लेखी युक्तिवाद सादर करण्याचा दिला आदेश









