वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्समध्ये अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पेन्शन सुधारणांविषयक सादर करण्यात आलेल्या एका योजनेच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू झाली आहेत. या निदर्शनांमुळे रेल्वे अन् विमानसेवा प्रभावित झाली असून अनेक शाळा बंद ठेवाव्या लागल्या आहेत. नव्या पेन्शन योजनेच्या अंतर्गत निवृत्तीचे वय वाढविले जाणार आहे. नवे विधेयक संसदेत संमत झाल्यावर निवृत्तीचे वय 62 वरून 64 वर्षे होणार आहे. तसेच पूर्ण पेन्शनसाठी आवश्यक सेवा कालावधीही वाढविला जाणार आहे.

नव्या पेन्शन योजनेच्या प्रस्तावांच्या अंतर्गत 2027 पासून लोकांना पूर्ण पेन्शन मिळविण्यासाठी एकूण 43 वर्षे काम करावे लागणार आहे. सध्या हा किमान सेवा कालावधी 42 वर्षे होता असे पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी सांगितले आहे. या प्रस्तावाच्या विरोधात पॅरिससमवेत 200 शहरांमध्ये निदर्शने झाली आहेत. हा प्रस्ताव फ्रान्सच्या शेअर-आउट पेन्शन सिस्टीमच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण उपाय असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. काम करणारे लोक आणि सेवानिवृत्त लोकांमधील गुणोत्तर वेगाने प्रतिकूल होत चालले आहे. याचमुळे निवृत्तीचे वय वाढविण्याच विचार केला जात आहे. बहुतांश युरोपीय देशांनी निवृत्तीचे वय वाढविली ओ. इटली आणि जर्मनीत निवृत्तीचे वय 67 वर्षे आहे. स्पेनमध्ये 65 वर्षे तर ब्रिटनमध्ये निवृत्तीचे वय 66 वर्षे असल्याचे फ्रान्स सरकारने नमूद पेले आहे.









