फिरोज मुलाणी / औंध :
65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत टांग कुणी कुणाला मारली यावरून आखाड्यात उडालेल्या चर्चेच्या धुरळ्यात मल्लांनी केलेली दमदार कामगिरी झाकोळून गेली आहे. राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत शिवराजने मानाचा किताब जिंकला आहे. दुखापतीवर मात करून त्याने दाखवलेली जिद्द कौतुकास्पद आहे. मात्र पहिल्या फेरीपासून उपांत्य आणि अंतिम फेरीपर्यंत नव्या दमाच्या मल्लांनी केलेली कामगिरी देखील दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळाल्यास निकाल बदलून दाखवण्याची क्षमता या मल्लांच्या अंगात आहे.
महाराष्ट्र केसरी आखाड्यात गादी आणि माती गटातील विविध वजनगटात स्पर्धा पार पडली. कुस्तीशौकिनांचे लक्ष मात्र खुल्या गटात लढणाऱ्या दिग्गज मल्लांच्या लढतीकडेच लागले होते. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पहिल्या फेरीपासून अनेक धक्कादायक निकाल लागले. स्पर्धेतील अनपेक्षित पराभवाने मल्लांच्या कामगिरीचे मुल्यमापन करता येणार नाही. कुस्तीत हार-जीत असतेच मात्र पडला का पाडला यापेक्षा तो लढला कसा याचे देखील मुल्यमापन कुस्तीशौकिन करीत असतात. महाराष्ट्र केसरी प्रुथ्वीराज पाटील याला यावेळी अनपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागला. गतवर्षी साताऱ्यात प्रुथ्वीराज माऊलीला भारी ठरला होता. यावर्षी मात्र माऊलीने प्रुथ्वीराजच्या लढण्याचा बारकाईने अभ्यास केला असल्याचे गादीवर लढताना दिसून आले. सूर मारुन पट काढण्यात प्रुथ्वीराज माहीर आहे. परंतु त्याच डावावर माऊलीने काऊंटर अॅटक करताना त्याला धोकादायक स्थितीत पकडून गुण वसूल केले. प्रुथ्वीराजवरील विजयानंतर त्याचा आत्मविश्वास वाढल्याचे जाणवले उपउपांत्य फेरीत त्याला तगड्या शिवराजचा सामना करणे जड गेले. या लढतीत डावपेच माऊलीने लढवले मात्र वजनाचा ताळमेळ लागला नाही. माऊली हुशार आणि जिगरबाज पैलवान आहे. मैदानी कुस्ती आणि गादीवर लढताना तो धाडसाने लढतो. स्पर्धेत सातत्य दाखवले तर डाॅर्कहाॅर्स बनवण्याची क्षमता त्याच्याकडे नक्की आहे.
महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील अनेक अव्वल दर्जाच्या मल्लांना पराभवाचे पाणी पाजणारा सिकंदर शेख लढवैय्या मल्ल आहे. मैदानी कुस्ती आणि स्पर्धेतील कुस्ती यामध्ये गल्लत करून चालणार नाही याचा धडा त्याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून घेतला पाहिजे. तो धाडसाने आक्रमक लढतो आरपार कुस्ती करण्यावर त्याचा भर असल्याचे दिसून आले मात्र आक्रमणाला संयम आणि बचावाची देखील जोड देणे गरजेचे आहे. आघाडीवर असताना निर्णायक क्षणी संयम दाखवण्याचे कसब त्याला जमले तर त्याला रोखणे प्रतिस्पर्ध्यांना जड जाईल. उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर बरोबर लढताना त्याने दाखवलेली हुशारी त्याला पुढे घेऊन गेली. साताऱ्यात दोघांच्या लढतीत तब्बल तेवीस गुणांचा पाऊस पडला होता.
हाताची सांड काढताना विशाल उंचीचा फायदा घेऊन टांग मारतो. यावेळी निर्णायक लढतीत सिकंदरने सांड न काढता त्याला नियंत्रण रेषेच्या बाहेर काढून गुण वसुल केले. महेंद्र बरोबरच्या अंतिम लढतीत आघाडीवर असताना देखील आततायीपणा सिकंदरला नडला विशाल बरोबर लढताना जे टेक्निक त्याने वापरले तसेच डावपेच उंचपुऱ्या महेंद्रशी लढताना दाखवले असते तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. माती गटात सिकंदरवर विजय मिळवून खळबळ उडवून देणाऱ्या महेंद्रने वर्षभर केलेल्या अभ्यासामुळे महाराष्ट्र केसरीचा पेपर सोपा गेल्याचे जाणवले. गतवर्षीच्या पराभवातून त्याने धडा घेतला. ज्युनियर जागतिक कुस्ती स्पर्धेत त्याने पदक मिळवले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील लढतीचे तंत्र त्याने अवगत केले. शिवाय राष्ट्रीय स्तरावरील सराव शिबीरातील मोठा फायदा झाल्याचे त्याच्या कामगिरीवरुन दिसून आले. पहिल्या फेरीत पिछाडीवर असताना देखील सिंकदरच्या लढतीत त्याने धीर सोडला नाही. आक्रमक लढणारा सिकंदर चूक करणार याची त्याने वाट पाहिली आणि संधी मिळतातच टांग मारुन निकाल बदलून दाखवला शेवटच्या दीड मिनिटांत सिकंदर गुण घेण्यासाठी निकराने लढला मात्र यावेळी महेंद्रने केलेला बचाव त्याच्या मदतीला आला. शिवराजने त्याला आसमान दाखवले असले तरी कुस्तीशौकिन महेंद्रच्या कामगिरीवर खुष आहेत. यावर्षी देखील त्याने सरावात सातत्य राखले तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुढची पायरी चढणे त्याला कठीण जाणार नाही.
गतवर्षी झालेल्या दुखापतीतून बाहेर पडलेला लातूरच्या शैलेशने देखील चांगली कामगिरी केली आहे. दमाचा मोठा बॅलन्स त्याच्या बॅकेत आहे. उपउपांत्य फेरीत त्याने महेंद्रला बराच वेळ झुंझवले होते. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन देखील अनुभव आणि योग्य डावपेच लावून लढत राहिला त्यामुळे त्याच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे. तरी देखील नवीन दमाची मुले स्पर्धेत पुढे येत आहेत. त्यांच्या लढण्याचा अभ्यास हर्षवर्धनला करावा लागेल अन्यथा कोरी पाटी असलेल्या नवख्या मल्लांचा सामना करणे अवघड जाईल. सांगलीचा संदीप मोटे आणि सुबोध पाटील चिकाटीने लढले. उंचपुऱ्या सुबोधकडे निकाल बदलण्याची क्षमता आहे. लढतीत त्याला जिगर दाखवावी लागेल आणि सरावात सातत्य कायम ठेवले तर त्याचे भविष्य चांगले आहे. कोणाच्याच गणपतीत नसणाऱ्या संदीपने जतचे पाणी पचवायला जड जाते हेच उपउपांत्य फेरीपर्यंत धडक मारून सिध्द केले आहे. इचलकरंजीचा शुभम पोटात गरगरीत असला तरी लढण्याची कला चांगली आहे. ढेरी असताना श्रीलंकेचा क्रिकेटपटू अर्जुन रणतुंगा चोरट्या रना काढण्यात माहीर होता तसाच शुभम देखील लढतीत गुणफलक हालता ठेवून प्रतिस्पर्ध्यावर दबाव वाढवतो. ग्रीकोरोमन लढतीतील राष्ट्रीय विजेता तुषार डुबे याच्यावर गुण घेताना समोरच्या पैलवानाला बरीच ताकद खर्च करावी लागते. तुषारने केवळ बचाव नको तर सोबत आक्रमणाची जोड देखील आवश्यक असल्याचे मत कुस्तीशौकिनांनी व्यक्त केले आहे. विद्यापीठ पदक विजेता अक्षय मंगवडेने यंदा एक पायरी वर चढून सुधारणा झाल्याचे दाखवून दिले आहे. मल्लांनी कामगिरीत सातत्य ठेवून झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळली तर पुढील वर्षी महाराष्ट्र केसरी आखाड्यातील चित्र निश्चित वेगळे दिसेल.
छोट्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत छोट्या गटातील मल्ल देखील अतिशय प्रेक्षणीय कामगिरी करुन आपल्या पदकाचा रंग बदलण्यात यशस्वी ठरले. आयोजकांनी पदक विजेत्या मल्लांच्या कामगिरीचे कौतुक करताना त्यांच्यावर बक्षिसाची खैरात केली गळ्यात पदक घालून बुलेटवर स्वार होताना अनेक मल्लांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तेज झळकत असल्याचे दिसत होते.









