प्रतिनिधी /पणजी
राज्यपालांच्या अभिभाषणात म्हादईवर एक शब्द नसल्याबद्दल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी खंत व्यक्त केली आणि जनतेने आता आवाज उठवावा, असे आवाहन केले. म्हादईसाठी जागे होऊन आवाज बुलंद करण्याची वेळ येऊन ठेपल्याचे ते म्हणाले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन ठरावावरील चर्चेत ते बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले की, राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. त्यावर राज्यपालांच्या भाषणात काहीच उल्लेख नाही. अमलीपदार्थांचा तर गोव्यात सुळसुळाट वाढला असून गोवा राज्य देशाचे ‘ड्रग्ज कॅपिटल’ होत आहे. कारागृहात, शाळा, कॉलेज येथेही ड्रग्ज मिळतात.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली हवी
गावांना जोडणारी चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. म्हणून लोकांना वाहने विकत घेऊन ती बाहेर काढावी लागतात. त्यामुळे अपघात, वाहतूक कोंडी वाढल्याचे दुष्परिणाम दिसत असल्याचे आलेमाव यांनी नमूद केले. भटकी गुरे आणि त्यांचा प्रश्न सोडवण्यास सरकार अपयशी ठरले असून अनेक प्रश्न तसेच असल्याचे आलेमाव यांनी निदर्शनास आणले.