अॅसिडमिश्रित पाण्यामुळे शेतजमीन उद्ध्वस्त झाल्याचा आरोप : शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी

वार्ताहर /काकती
काकती येथील शेतकरी आणि नेगलयोगी सुरक्षा रयत संघाच्यावतीने हिंडाल्को इंडस्ट्रीजचे प्रमुख प्रवेशद्वाराचे गेटबंद करत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन छेडून कारखाना व प्रशासनाचे लक्ष वेधले. गेटबंद असल्याने कुणालाच आत जाता येत नव्हते. त्यामुळे अधिकारी, कामगार वर्गाची मोठी तारांबळ उडाली. परिणामी वाहतुकीची कोंडी झाली. शिस्त लावण्यासाठी पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागली.
हिंडाल्को इंडस्ट्रीजचे अॅसिडमिश्रित पाणी काकती शेतजमिनीत शिरून जमिनी खराब झाल्या आहेत. यामुळे पिकांची वाढ खुंटून उत्पादनात घट होत आहे. आमच्या जमिनी सुधारण्यासाठी साहाय्य द्या, गेल्या 54 वर्षांपासून अॅसिडमिश्रित पाण्याने जमिनीची सुपीकता बिघडली आहे. 180 एकर जमीन खराब झाली असून तातडीने नुकसानभरपाई मिळावी. संबंधित शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळावी, अशी मागणी केली.
बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून सर्व्हिस रोडजवळील हिंडाल्कोच्या प्रवेशद्वारापाशी शेतकरी व महिला शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन छेडले. कारखान्याचे प्रमुख एच. आर. मॅनेजर परगावी गेल्याने आंदोलन ठिकाणी येऊ शकले नाहीत.
कारखान्याचे साहाय्यक अधिकारी मयूर यांनी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आपल्या मागणीचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. आपल्या मागणीची पूर्तता झाल्याशिवाय ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, असे संघाचे राज्याध्यक्ष धर्मराज गौडर, महिला जिल्हा राज्याध्यक्षा हेमा काजगार, राज्य संचालक महांतेश गौरी, संभाजी मोळेराखी यांनी पवित्रा घेतला. यामुळे हिंडाल्कोच्या अधिकाऱ्यांना काढता पाय घ्यावा लागला. शेतकरी व महिलांनी हिंडाल्कोच्या विरोधात घोषणाबाजी केली.
दिवसभरात हिंडाल्को इंडस्ट्रीजला घेऊन येणाऱ्या-जाणाऱ्या मालवाहू वाहनांची कोंडी झाली होती. सर्व्हिस रस्त्यावर लांबच लांब मालवाहू वाहनांचा ताफा लागला होता.
अखेर सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास कारखान्याचे साहाय्यक अधिकारी मयूर व सहकारी बेळगावचे प्रांताधिकारी बलराम चौहान आदींनी शेतकऱ्यांच्या मागणीचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. येत्या शुक्रवारी विचार विनिमय करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेऊन गेट उघडण्यात आले.
यावेळी रयत संघाचे तालुका अध्यक्ष मारुती नरेगवी, तालुका उपाध्यक्ष मोहन कंग्राळकर, बसवंत येतोजी, सिद्राई होळी, बसवंत कुंभार, कल्लाप्पा मोळेराखी, नागाप्पा बैलराखी, सिद्धाण्णी टुमरी आदींनी मागणीच्या पूर्ततेसाठी जल्लोष केला. समाधानकारक मागणी न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.









