चन्नम्मा सर्कलजवळ अबकारी विभागाची कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
गोव्याहून बेळगावला मासे वाहतूक करणाऱ्या गुड्स वाहनामधून बेकायदा दारू वाहतूक केली जात होती. अबकारी अधिकाऱ्यांनी बुधवारी राणी चन्नम्मा सर्कलजवळ गोव्यातील एका तरुणाला अटक करून अडीच लाखांचा दारूसाठा जप्त केला आहे.
मासे वाहतूक करणाऱ्या जीए 09 यू 6564 क्रमांकाच्या वाहनातून दारू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच अबकारी उपअधीक्षक रवी मुरगोड, निरीक्षक मंजुनाथ गलगली, उपनिरीक्षक ए. व्ही. रावळ, सुनील पाटील, एम. एफ. कटगेण्णावर, बी. एस. अटीगल, प्रवीण बेळकुड व त्यांच्या सहकाऱ्यांनी चन्नम्मा सर्कलजवळ गुड्स वाहन अडविले. सन्नी श्रीपाद कोरगावकर (वय 28, रा. गावकरवाडा, मोलक्युम, दक्षिण गोवा) याला अटक करण्यात आली आहे. 8 रिकाम्या क्रेटसच्या मागे 549 लिटर दारूसाठा ठेवण्यात आला होता. अबकारी अधिकाऱ्यांनी तो जप्त केला आहे. वाहनांसह जप्त मुद्देमालाची किंमत 14 लाख 57 हजार 240 रुपयांइतकी होते.









