चिक्की-केळ्यांना पसंती
प्रतिनिधी /बेळगाव
विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा, यासाठी शिक्षण विभागाकडून शेंगदाणा चिक्की, केळी अथवा अंडे याचे वितरण करण्यात येत होते. परंतु मागील महिन्याभरात अंड्यांचे दर वाढत गेल्याने अंडी वितरणाला ब्रेक लागला आहे. दिलेल्या रकमेमध्ये अंडी वितरण करणे शक्य नसल्याने शाळांमध्ये चिक्की व केळ्यांचे वितरण केले जात आहे.
बेळगावसह संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये अंडी व चिक्की वितरण सुरू आहे. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा, यादृष्टीने राज्य सरकारने ही योजना सुरू केली. आठवड्यातून एकदा अंडी व चिक्की वितरण करण्यात येते. जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना चिक्की अथवा केळे वितरित केले जाते.
मागील महिन्याभरापासून थंडीत वाढ होताच अंड्यांची मागणी वाढली असून आपसुकच अंड्यांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पाच रुपयांना मिळणारे अंडे जानेवारीत साडेसहा रुपयांपर्यंत पोहोचले. अंड्यांच्या दरात वाढ झाल्याने शाळांमधील वितरणाला ब्रेक लागला. काही शाळांनी अंडे वितरण बंद करून चिक्की वितरण सुरू केले आहे. अंड्यांचा दर व मिळणारी रक्कम याचा ताळमेळ बसत नसल्याने मुख्याध्यापक व एसडीएमसी कमिटीने हा निर्णय घेतला आहे.
शहरात चिक्कीला पसंती
बेळगाव शहर व उपनगरांमध्ये 250 च्या आसपास सरकारी शाळा आहेत. यापैकी 5 ते 6 शाळांमध्ये जेवण तयार केले जाते. उर्वरित शाळांना एनजीओमार्फत जेवण तयार करून देण्यात येते. त्यांच्याकडून अंडे उकडून विद्यार्थ्यांना दिले जाते. परंतु अंडे उकडून विद्यार्थ्यांना देईपर्यंत थंड होत असल्याने विद्यार्थ्यांची चिक्कीला मागणी असते.









